चिखलीत पूर्ववैमनस्यातून दोन गटात हाणामारी

0

चिखली ः रुपीनगर तळवडे येथे पूर्ववैमनस्यातून दोन गटात हाणामारी झाली. टोळक्याने राडा घालत एकमेकांना मारहाण आणि वाहनांची तोडफोड केली. ही घटना रविवारी (दि. 17) रात्री साडे आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी, सागर शंकर चव्हाण (वय 30, रा. तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शरद भालेकर, योगेश भुजबळ, लक्ष्मण भालेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दगड मारुन थांबविली मोटार…
सागर चव्हाण याने दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी रात्री सागर हा त्याच्या मित्राला सोडवण्यासाठी मोटारीतून जात होता. त्यावेळी आरोपींनी मोटारीवर दगड मारून मोटार थांबविली. त्यानंतर सागरला मोटारीबाहेर खेचून मारहाण करण्यास सुरुवात केली. सागरला वाचवण्यासाठी त्याचे मित्र आले असता त्यांनाही लाकडी दांडक्याने मारहाण करून मोटारीची तोडफोड केली. याच्या परस्परविरोधी शरद वसंत भालेकर (वय 33, रा. तळवडे) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार सागर चव्हाण आणि त्याच्या आठ ते दहा साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवजयंती मिरवणुकीचा होता राग…
शरद भालेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 19 फेब्रुवारीला झालेल्या शिवजयंती मिरवणुकीत भालेकरचा मित्र आणि सागर यांच्यात वाद झाले होते. याचा राग मनात धरून सागर त्याच्या साथीदारांसह भालेकर यांच्या घराजवळ आला. लाकडी दांडक्याने त्यांना जबर मारहाण करत त्यांच्या गळ्यातील पाच ग्रॅम वजनाची सोन्याची चैन हिसकावून पोबारा केला. चिखली पोलीस अधिक याचा तपास करीत आहेत.