चिमुकल्याला वाचवण्याच्या प्रयत्नात अ‍ॅपे रीक्षा उलटली ; एक ठार, तिघे जखमी

0

हंबर्डी गावाजवळ अपघात ; साखरपुड्याला जाणार्‍या वर्‍हाडींवर शोककळा

फैजपूर- फैजपूर-यावल रस्त्यावर हंबर्डी गावाजवळ अ‍ॅपे रीक्षासमोर आलेल्या लहान मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात अ‍ॅपे रीक्षा झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे साखरपुड्याच्या आनंदावर विरजण पडले आहे. राकेश रमेश सोनवणे (45, रा.लहान वाघोदा, ता.रावेर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

साखरपुड्याला जाताना उलटली अ‍ॅपे
मिळालेली माहिती अशी की, लहान वाघोदे (ता.रावेर) येथील एक कुटुंब सातोद (ता.यावल) येथे अ‍ॅपे रीक्षाद्वारे साखरपुड्यासाठी येत होते. दरम्यान फैजपूर-यावल रस्त्यावरील हंबर्डी गावाजवळ अचानक एक लहान मुलगा खेळता-खेळता रस्त्यावर आला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात अ‍ॅपे रीक्षा रस्त्याच्या कडेला उलटली. त्यात डोक्याला मार लागून राकेश रमेश सोनवणे यांचा मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले. फैजपूर येथील एका खाजगी रुग्णालयात जखमींना उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यात राकेश सोनवणे याला डोक्याला जबर मार लागला असल्याने रुग्णालयात डॉक्टरांनी मयत घोषित केले. राकेश मयत झाल्याची माहिती त्यांच्या पत्नीसह मुलांना कळताच त्यांनी रुग्णालयात टाहो फोडला. राकेश याचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांनी धाव घेतली.