महामार्गावरील अपघातात दुचाकीस्वारासह दोघे जखमी

0

पोद्दार शाळेजवळ अज्ञात वाहनाची धडक : रुग्णालयात उपचार

जळगाव: पुण्याहून जळगावला आलेल्या मॅकेनिकला गावाकडे घेवून जात असतांना भरधाव वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणासह मॅकेनिग असे दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना 3 रोजी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रं. 6 वर पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ घडली. सचिन विलास महाजन (वय 24, रा. जवखेडा, ता. एरंडोल) व संदिप गोविंदा बर्‍हाणपुरे(वय 30, रा. पुणे) असे दोघ जखमींचे नाव आहे. दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार संदिप हा पुण्यात गॅरेज मॅकेनिक आहे. दरम्यान, सचिन याच्या ट्रॅक्टरचे काम करण्यासाठी संदिप हा पुण्याहून जळगाव आला होता. त्याला घेवून सचिनच्या दुचाकी (क्र. एम.एच. 19. सीपी. 8117) ने सायंकाळी जवखेड्याकडे जात होता. यादरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रं. 6 वरील पोदार इंटरनॅशनल स्कू लजवळ सचिनच्या दुचाकीला समोरुन जाणार्‍या अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला असून दुचाकीस्वार सचिन याच्या उजव्या पायाचे हाड तुटले आहे. तसेच त्याच्या हाताला, डोक्याला देखील दुखापत झाली आहे. तर संदिपचा उजवा हात कोपर्‍यापासून चेंदामेंदा झाला आहे. दोघांचीही परिस्थिती गंभीर असून दोघांना जैन इरिगेशनच्या रुग्णवाहिकेतून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

रिक्षाला ओमनीची धडक; दोन जखमी

जळगाव: जळगावहून विदगावकडे जाणार्‍या रिक्षाला अज्ञात ओमनी वाहनाने दिलेल्या धडकेत रिक्षातील दोन जण जखमी झाल्याची घटना दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली. दोघांना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, राजेंद्र अंकुश कोळी आणि संदीप भागवत कोळी (वय-36) दोन्ही रा. विदगाव हे दोघे रिक्षाने जळगावहून विदगाव येथे येत असतांना दुपारी 4 वाजेच्या सुमारास समोरून येणार्‍या ओमनी वाहनाने जोरदार धडक दिली. यात रिक्षातील दोघे जण जखमी झाले. दोघांना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.