जलपर्णी काढण्याच्या कामाला टाळाटाळ केल्याप्रकरणी ठेकेदाराला नोटीस

0 2

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील जुनी सांगवी येथील मुळा नदीपात्रातील जलपर्णी काढण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी नोटीस देताच ठेकेदाराकडून जलपर्णी काढण्यास सुरुवात केली. मात्र, दोन दिवस जलपर्णी काढली अन्‌ पुन्हा काम बंद केले आहे. त्यामुळे आता महापालिका पुन्हा ठेकेदाराला तिसरी नोटीस देणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा नद्या वाहतात. पवना नदीचे पात्र 24 किलो मीटर, इंद्रायणीचे 19 आणि मुळा नदीचे 10 किलो मीटर पात्र आहे. मुळा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचली आहे. जलपर्णीचा विळखा कायम आहे. त्यामुळे सांगवी, बोपखेल, वाकड, कस्पटेवस्ती परिसरातील रहिवाशांना डासांचा प्रादुर्भाव सहन करावा लागत आहे. शहरातून वाहणार्‍या पवना, इंद्रायणी व मुळा नदीपात्रात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचते. त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील रहिवशांना डास व दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

मुळा नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे काम बंद आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने नदीपात्राची पाहणी केली. त्यावेळी ठेकेदारामार्फत नदीपात्रातील जलपर्णी काढली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महापालिकेने संबंधित ठेकेदाराला दोन नोटीस बजाविल्या होत्या. सात दिवसात जलपर्णी काढण्याबाबत कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर ठेकेदाराने जलपर्णी काढण्यास सुरुवात केली होती. परंतु, आज पुन्हा जलपर्णी काढण्याचे काम बंद करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिका आता पुन्हा ठेकेदाराला नोटीस देणार आहे,

याबाबत बोलताना महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय म्हणाले, “मुळा नदीपात्राची पाहणी केली असता. जलपर्णी काढलेली दिसून येत नव्हती. त्यामुळे ठेकेदाराला नोटीस देण्यात आली होती. नोटीस दिल्यानंतर ठेकेदाराने काम सुरु केले होते. परंतु, आज तपासणी केली असता काम बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पुन्हा ठेकेदाराला नोटीस दिली जाणार आहे”