जळगावकरांना अजून किती मूर्ख बनवाल?

0

अमित महाबळ

खान्देशच्या सीमेवर एकीकडे धुळे आणि दुसरीकडे नवीनच नामकरण झालेले धुळगाव अर्थातच जळगाव शहर. भाजपाच्या सत्ताकाळात जळगाव शहराची किती वेगवान (?) प्रगती झाली माहित नाही पण आमदारांची सुपारी महापालिकेतील अधिकार्‍यांनी घेतल्याचे गेल्याच आठवड्यात ऐकिवात आले. ही सुपारी कोणी दिली याचे वेगवेगळे तर्क लावत त्याचे खापर ‘अमृत’चा ठेकेदार आणि राजकीय विरोधकांवर फोडण्यात आले. त्याचे भलेमोठ्ठे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केले गेले पण जेव्हा आमदार महोदय कोंडीत सापडले होते तेव्हा हीच भाचेमंडळी कुठे होती? भाजपाच्या मंडळींना वाईट वाटेल पण ते महापालिकेचे प्रशासन अथवा सत्ता सांभाळण्यास खरेच पात्र आहेत का? लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि आताची स्पष्ट बहुमताची सत्ता यांचे वास्तववादी परीक्षण भाजपावाल्यांनी करून घेतले पाहिजे. गत सत्ताधार्‍यांचे नामोनिशाण पुसून टाकण्यात आपण कुठे कमी पडलो याचे मंथन प्रदीर्घ बैठकीत केले पाहिजे.

राजकारणाच्या नादात शहराचा कसा सत्यनाश झाला हे जनतेला ठावूक आहे. ते वेगळे सांगायची गरज नाही पण शहर विकासाची आपली रेष भाजपाला मोठी करता आली आहे का? अमृतपायी जळगावकरांची हाडे खिळखिळी झाली आहेत. मक्तेदाराकडून काम वेळेत पूर्ण करून घ्यायची जबाबदारी कुणाची होती आणि आहे? त्यासाठी महापालिकेचे प्रशासन व सत्ताधार्‍यांनी काय केले? हाच प्रकार स्वच्छतेच्या बाबतीत आहे. एलईडी पथदिव्यांचे काय झाले? उड्डाणपुलाचे  काम मार्गी लावल्याचा तोरा मिरविला जातो पण हे काम तरी वेळेत पूर्ण होणार आहे का? पिंप्राळ्याच्या उड्डाणपुलाचे काम सुरू होणे बाकी आहे. महापालिका हद्दीत महामार्ग चौपदरीकरण केले जात आहे पण पिंप्राळा रेल्वे पुलाच्या विस्तारीकरणाचे काय? दोन्ही बाजूने आठ किमीपर्यंत समांतर रस्त्यांचे काय?  मनपा कर्जमुक्त करून आणल्याची टिमकी वाजवली जात आहे तरीही दुसरीकडे शासनाला दरमहा परतफेड चालूच आहे मग कर्जमुक्ती कशाला म्हणायचे?

दादागिरीवर खापर फोडणार्‍या भाजपामधील भाचेमंडळींनी आपलीच नेतेमंडळी कुठे, कोणत्यावेळी काय करतात याची माहिती ठेवायला हवी. अमृतच्या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी सुरेशदादांशी असलेल्या जुन्या मैत्रीचा दाखला देत त्यांना सोबत घेण्याची भाषा कुणी केली होती? निवडणुकीतील विजयानंतर 7, शिवाजीनगरला सदिच्छा भेट द्यायला कोण गेले होते? राज्याचे माजी मुख्यमंत्री जळगावला आले असता मुक्कामी कुठे थांबले होते? 300 कोटी देण्याची भाषा करणारे राज्यातील पक्षाची सत्ता जाताच आता कुठे गायब झाले आहेत? त्यांचा जळगावशी संबंध केवळ पदाधिकारी निवडीपुरताच आहे का? आमदारकी संपविण्याची सुपारी घेतल्याची भाषा आज केली जातेय पण हेच आमदार महोदय 25 कोटींवरून कोंडीत सापडले होते तेव्हा त्यांचा पक्ष होता कुठे? त्यावेळी तर राज्यात त्यांच्याच पक्षाची सत्ता होती. आमदार भाजपाचा तर महापालिकेत सत्ता खाविआची अशी विरोधाभासी स्थिती चार वर्षे होती. 2018 मध्ये केंद्रात, राज्यात आणि महापालिकेतही भाजपाची सत्ता झाली. त्यानंतर दीड वर्ष भाजपामय वातावरण होते. जळगाव सुधारायचे होते, सुपारी घेतलेल्यांना धडा शिकवायचा होता, प्रशासनावर नियंत्रण मिळवायचे होते तर तसा कर्तव्यकठोर अधिकारी तेव्हाच्या सत्ताधार्‍यांनी अर्थातच भाजपाने जळगाव महापालिकेत का पाठवला नाही? का मुद्दाम तसे करणे टाळले गेले? 25 कोटींचा प्रचंड घोळ घातला गेला. या निधीतील कामाचे श्रेय भाजपाला मिळू नये म्हणून विरोधकांनी प्रयत्न केले असल्याचे भाजपाचे मत असेल तर मनपातील कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असलेले, प्रशासकीय खाचाखोचा माहित असलेले होते कुठे? अशांची भाजपात कमी नक्कीच नसावी. भाजपाने आतापर्यंत विरोधकांच्या नाकावर टिच्चून कामे करून दाखवायला हवी होती. आता वेळ निघून गेल्यानंतर नक्राश्रू ढाळण्यात काय अर्थ आहे? भाजपाला स्पष्ट बहुमतामधील सत्ता आहे. जळगावचे भले करायचे असेल तर तशी कृती त्यांच्याकडून व्हायला हवी. अन्यथा जळगाव महापालिकेतील सत्ता चालवावी ती शिवाजीनगरवाल्यांनीच असे लोकांनी म्हणू नये. तसेही 100 कोटींवरील स्थगिती उठवावी म्हणून भाजपाने शिवसेनेच्या नेत्यांना बरोबर घेतले आहे. महापालिकेत तगडे बहुमत असतानादेखील पदाधिकारी निवडीत शिवसेनेला सोबत घेतले गेले. ज्या शिवसेनेला सोबत घेतले जात आहे त्या पक्षाचे नगरसेवक कोणाच्या गटाचे आहेत हे भाचेमंडळींना माहित नाही का? लोकांना अजून किती दिवस मूर्ख बनवणार? जळगावकरांनी बर्‍याच अपेक्षा ठेवून सत्ताबदल केला आहे. त्या कसोटीवर पक्षाला खरे कसे उतरता येईल, जळगाव शहर कसे चकाचक करता येईल? यावरच विचार झाला तर ते भाजपासाठी अधिक श्रेयस्कर ठरेल.