जळगावात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला रिक्षाचालकाने मारहाण करुन लुटले

0

जळगाव : गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी मोहित किशोर भोळे (19, रा.वाघ नगर, जळगाव) यास रिक्षाचालकाने मारहाण करुन त्याच्याकडून 500 रुपये हिसकावून नेल्याची घटना शहरातील डी.मार्टजवळ गुरुवारी दुपारी घडली. दरम्यान या घटनेनंतर विद्यार्थी पोलीस ठाण्यात गेला असता त्याच्याकडून तक्रार घेण्यात टाळाटाळ करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

सर्व संशयित मद्याच्या नशेत असल्याची माहिती
डीप्लोमा उत्तीर्ण झाल्यानंतर मोहीत याने गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. गुरुवारी तो बोर्ड प्रमाणपत्र घेण्यासाठी देवकर महाविद्यालयात गेला होता. तेथून दुपारी 12.30 वाजता रिक्षाने शहरात परतला. डी मार्टजवळ उतरला. चालकाला पाचशे रुपयाची नोट दिली असता चालकाने सुट्टे नाहीत का? असे विचारले, त्यावर मोहीत नाही म्हटला असता चालकाने त्याच्या कानशिलात लगावली. पाचशे रुपयाची नोट हिसकावून घेत तुझ्याने जे होईल ते करुन घे अशी धमकी देत तेथून पळून गेला. या रिक्षात मागे आणखी दोघं जण बसले होते व ते चालकाचे परिचयाचे होत तसेच सर्व जण मद्याच्या नशेत असल्याचे मोहीत याने सांगितले.

पोलिसांचा हद्दीचा वाद, तक्रार घेतली नाही
या घटनेनंतर मोहीत याने इच्छा देवी चौकीत जावून एका पोलिसाला सांगितले. त्या पोलिसाने एमआयडीसी पोलीस स्टेशन जाण्याचा सल्ला दिला. तेथे गेल्यावर हा तरुण दीड तास थांबला,घटनास्थळ रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याचे सांगून तेथे जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे मोहीत याने पुन्हा रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठले.तेथेही दीड तास थांबवून ठेवत ठाणे अमलदाराने आज नको, उद्या ये असे सांगून हाकलून लावले. त्यामुळे गुन्हाच दाखल झाला नाही.