जळगावात कारवाईसाठी वाहन थांबविताच चालकाने वाहतूक पोलिसाला घेतला चावा

0

आकाशवाणी चौकातील घटना ; जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव : भरधाव वेगाने वाहन चुकीच्या बाजूने नेवून चौकात उभ्या वाहतूक पोलिसांच्या अंगावर नेल्याची थरारक घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या घटनेनंतर कारवाईसाठी पोलिसांनी वाहन थांबविले असता, चारचाकीतील चालकाने धिंगाणा घालत दोन वाहतूक पोलीस कर्मचार्‍यांचे कपडे फाडले. एवढ्यावरच हा चालक जुमानला नाही तर त्याने चक्क प्रशांत विलास मोरे या वाहतूक पोलिसाच्या दोन्ही पायाला चावा घेवून त्यांना जखमी केल्याचीही धक्कादायक प्रकार यावेळी घडला. यानंतर पोलीस निरिक्षकांसह कर्मचार्‍यांनी सदरच्या चालकाला ताब्यात घेवून जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले. दिपक प्रल्हाद बिर्‍हाडे (वय 32) समतानगर असे चालकाचे नाव आहे. दरम्यान याप्रकाराची पोलिसांसह नागरिकांमध्ये एकच चर्चा होती.

तीन जणांना कट मारत पोलिसांच्या अंगावर नेले वाहन
आकाशवाणी चौकात पंडित साळी, प्रशांत मोरे, गणेश पाटील, शशीकांत मोरे हे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस कर्मचारी डयूटी बजावत होते. दरम्यान कटक येथून महेंद्र बोलेरो गाडी घेत (क्रमांक एम.एच. 47 पी.सी. 264) पोहच करण्यासाठी चालक दिपक प्रल्हाद बिर्‍हाडे हा नाशिककडे जात होता. इच्छादेवी चौकातून अजिंठा चौक ात त्याने भरधाव वेगात वाहन आणून आकाशवाणी चौकात दत्तमंदिराकडे रॉँगसाईडला वळविले. त्यानंतर पुन्हा रॉँगसाईडने आकाशवाणी चौकाकडे वाहन नेण्याचा प्रयत्न करत असताना त्याने दोन ते तीन वाहन चालकांना कट मारला. तसेच याठिकाणच्या पोलिसांच्या अंगावरही वाहन नेण्याचा प्रयत्न केला. यानंतर कर्मचारी प्रशांत विलास मोरे तसेच पंडित साळी यांनी तत्काळ त्याला रोखले.

जखमी पोलिसाला नेले रुग्णालयात
जाब विचारताच त्याने पोलिसांशी वाद घातला. वादादरम्यान तो प्रशांत मोरे व पंडीत साळी यांच्या अंगावर धावून गेला. झटापटीत त्याने मोरे तसेच साळी यांचे गणवेश फाडला. यानंतर कर्मचार्‍यांच्या अंगावर माती फेकून मोरे यांच्या उजव्या पायाला दोन ठिकाणी चावा घेत जखमी केले. घटना कळताच पोलीस निरीक्षक देविदास कुनगर तसेच कर्मचारी, जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचार्‍यांनी आकाशवाणी चौकात धाव घेतली. तीन ते चार कर्मचार्‍यांनी त्या पकडले. व पोलिसांनी वाहनासह चालकाला ताब्यात घेऊन जिल्हापेठ पोलीस स्टेशनला आणले. चावा घेतल्याने जखमी पोलीस प्रशांत मोरे यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. औषधोपचारानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात येवून चालकाविरोधात तक्रार दिली. त्यावरुन त्याच्या विरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दिपक बिर्‍हाडे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यापूर्वीही त्याने चावा घेणे, स्वतःचे डोके आपटून जखमी करुन घेण्याच्या घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.