जळगावात राजकमल सिनेमागृहाजवळ बंगाली कारागिराला मारहाण करुन लुटले

0

शहर पोलिसांनी एका संशयिताला केली अटक ; बेदम मारहाण करुन मोबाईल व 800 रुपये लांबविले

जळगाव- दुकानावर काम करण्यासाठी जात असलेल्या सागर मोहन बेसार (वय 28 मूळ रा. वर्धमान मेमारी, सुलतानपूर, ता.जि. वर्धमान, पश्‍चिम बंगाल) ह.मू जोशीपेठ या बंगाली कारागिराला दोन जणांनी बेदम मारहाण करुन त्याच्याकडील मोबाईल व रोख 800 रुपये लांबविल्याची घटना 15 रोजी 9 वाजेच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्यात शहर पोलिसांनी रविवारी सचिन प्रदीप भावसार वय 25 रा. चौघुले प्लॉट यास अटक केली आहे. त्याच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

कुणाला सांगितले, तर जीवंत ठेवणार नाही…
बंगालमधील मूळ रहिवासी सागर बेसार हे 6 महिन्यापासून जळगावातील जोशीपेठ येथे वास्तव्यास आहेत. कलाम शेख यांच्याकडे सोन्चाच्या दागिण्यांना पॉलीश करण्याचे काम करतात. सोबत राहणार्‍या अजीम कलाम शेख याने सागर बेसार यास मोबाईल वापरण्यास दिला आहे. 15 रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास सागर बेसार हा राजकमल सिनेमागृहाजवळ नाश्ता करण्यासाठी गेला. येथून पुन्हा दुकानावर जात असताना सिडीकेट बँकेजवळ दोन अनोळखी तरुणांनी त्यास आवाज देवून बोलाविले. याकडे सागरने दुर्लक्ष केले, यानंतर संबंधित दोघेही सागरजवळ आले. त्यातील एकाने सागरच्या शर्टाची कॉलर पकडून दुसर्‍याने गालावर, पाठीवर पोटावर व मानेवर चापटा तसेच लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच सागरच्या खिशातील 5849 रुपयांचा मोबाईल तसेच रोख 800 रुपये हिसकावून घेतले. तसेच या घटनेबाबत कुणाला काही सांगितले, तर तुला जीवंत ठेवणार नाही, शी धमकी दिली. व दुचाकीवरुन पोबारा केला.

एकाला अटक, मुद्देमाल हस्तगत
या घटनेप्रकरणी सागर बेसार याच्या फिर्यादीवरुन दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला. सागर याने सांगितलेल्या वर्णनानुसार तपास अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल यांनी तपासचक्रे फिरविले. यात सचिन भावसार याचे नाव निष्पन्न झाले. त्यानुसार त्यांनी पोलीस निरिक्षक अरुण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील वासुदेव सोनवणे, सुनील पाटील, गणेश शिरसाळे, गणेश पाटील, अक्रम शेख, नवजीत चौधरी, विजय निकुंभ, रतन गीते, योगेश साबळे, भास्कर ठाकरे यांच्या पथकाने सचिन भावसार यास शहरातून अटक केली. चौकशीत त्याने पाच्या तायडे या साथीदाराचे नाव सांगितले असून गुन्ह्याची कबूली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यातील मोबाईल तसेच 800 रुपये हस्तगत करण्यात आले आहे.