जळगावात लग्नातून दिल्लीच्या विवाहितेचा अडीच लाखांचा ऐवज लांबविला

0

मानराज पार्क परिसरातील मैदानावरील घटना

जळगाव- शहरात दीराच्या लग्न समारंभासाठी आलेल्या दिल्ली येथील माधुरी निलेश केदारे यांची लग्न समारंभातून रोख रक्कम व दागिणे असा 2 लाख 47 लाखांचा ऐवज असलेली पर्स लांबविल्याची घटना 12 नोव्हेंबर रोजी मानराज पार्कजवळ श्रीराम संस्थेच्या मैदानवर घडली. दरम्यान लग्नासाठीसाठी केदारे यांनी दिल्ली येथून दागिणे खरेदी केले होते, मात्र लग्नापूर्वी ते लंपास झाल्याची दुर्देवी घटना घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दिराच्या लग्नासाठी आलेल्या जळगावात
नवी दिल्ली येथे माधुरी निलेश केदारे ह्या 59 एच टाईप 2 कॉर्टर्स सेक्टर 4 डीआयझेड एरिया, गोल मार्केट येथे पती निलेश कमलाकर केदारे तसेच दोन मुलांसह वास्तव्यास आहेत. त्यांचे पती हे महाराष्ट्र सदनात सहाय्यक लेखाअधिकारी म्हणून कार्यरत आहेत. माधुरी यांचे सासरे शहरातील कृष्णा पार्क शिवधाम मंदिराच्या मागे राहतात. 12 नोव्हेंबर रोजी माधुरी यांचे दीर नुपेश केदारे याचा लग्नसमारंभ होता. श्रीराम संस्थेचे मानपार्क परिसरातील मैदानावर या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी माधुरी ह्या 27 ऑक्टोबर रोजी जळगावात आल्या होत्या.

लग्नासाठीच दिल्लीहून खरेदी केले दागिणे
या लग्नसमारंभासाठी माधुरी केदारे यांनी कानातले तीन तोळ्याचे झुमके, दहा ग्रॅम्चे मंगळसूत्र व टाप्स असे सोन्याचे दागिणे घेतले होते. तसेच जळगावातून चार ग्रॅमचे मणीमंगळसूत्र व नाकातील फुली, दोन भार वजनाचे चांदीचे जोडवे अशा वस्तू घेतल्या. ही सर्व दागिणे माधुरी यांनी त्यांच्या पर्समध्ये ठेवले होते.

अवघ्या अर्धा तासात लांबविला ऐवज
माधुरी ह्या पती निलेश केदारे व इतर नातेवाईकांसोबत सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास वरातीसोबत मंडपात आल्या. याठिकाणी खुर्चीवर बसल्या. दागिणे तसेच रोकड असलेली पर्स खुर्चीखाली ठेवली. 8 वाजेच्या सुमारास पर्स बघितली असता, आढळून आली नाही. वडीलासोबत शोध घेवूनही ती मिळून आली. या पर्समध्ये 90 हजार रुपये किमतीचे 30 ग्रॅमचे सोन्याचे झुमके, 90 हजार रुपयांचा 30 ग्रॅमचा सोन्याचा नेकलेस, 30 हजार रुपयांचे 10 ग्रॅम सोन्याची मिनीपोत, 20 हजाराचे 4 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र व नाकातील फुली, 1 हजार रुपयांचे 2 भारचे चांदीचे जोडवे व 16 हजार रुपये रोख असा एकूण 2 लाख 47 हजाराचा ऐवज होता. चोरीची खात्री झाल्यावर माधुरी केदारे यांनी दुसर्‍या दिवशी रामानंद पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक रोहीदास ठोंबरे करीत आहेत.