जाहिरातीसाठी पालिकेलाही परवाना बंधनकारक

0

आयुक्तांसह दोन विभागाचा घ्यावा लागणार परवाना

पुणे : महापालिकेच्या तसेच कोणत्याही शासकीय विभागाच्या कार्यक्रमाच्या जाहिराती शहरात सार्वजनिक ठिकाणी करायच्या झाल्यास यापुढे आयुक्तांच्या परवानगीसह आकाशचिन्ह आणि परवाना विभागाचा तात्पुरता परवाना महापालिकेस घ्यावा लागणार आहे.

शहर महापालिकेकडूनच अनधिकृत जाहिरातबाजी केली जात असल्याने उच्च न्यायालयानेच महापालिकेच्या करभारावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात गेल्या काही वर्षांत अनधिकृत जाहिरातींना मोठ्या प्रमाणात उधाण आले आहे. त्यात राजकीय पक्ष कार्यकर्ते तसेच महापालिकेच्या जाहिरातीही मोठ्या प्रमाणात लावल्या जात आहेत.

पालिकेच्या कारभारावर ताशेरे

अनधिकृत जाहिरातींविरोधात न्यायालयात जनहित याचिका तसेच अवमान याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. त्याची सुनावणी सुरू असून नुकत्याच झालेल्या सुनावणीत महापालिकेकडूनच लावल्या जाणार्‍या जाहिरातींना कोणतेही परवनागी घेतली जात नसल्याचे याचिकाकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने महापालिकेच्या या कारभावर ताशेरे ओढले असून महापालिकेचा कार्यक्रम असला, तरी त्यासाठी तात्पुरता परवाना तसेच आवश्यक परवानग्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाची परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार, महापालिका आयुक्तांनी या बाबतचे आदेश काढले आहे.

संबंधित अधिकार्‍यावर होणार कारवाई

आयुक्तांनी काढलेल्या या आदेशात महापालिकेच्या कार्यक्रमासाठी लावण्यात येणार्‍या जाहीरातीची जबाबदारी ही ज्या विभागाचा कार्यक्रम आहे त्या विभाग प्रमुखाची असणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे अनधिकृत जाहिराती लावल्या गेल्यास त्याची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखवर निश्चित करण्यात आली आहे. तसेच न्यायालयाचा अवमान झाल्यास संबंधित अधिकार्‍यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे आदेशात म्हटले आले आहे.