जिल्हा हादरला : जळगावमध्ये दोन कोरोना संशयित रुग्णांचा मृत्यू

0

मृत्यूचे कारण अस्पष्ट : तपासणी अहवालाची प्रतिक्षा

जळगाव – येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी रात्री दाखल दोन कोरोना संशयित रूग्णांचा रात्री उशीरा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वीच जळगावमधील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला असताना आता एकाचवेळी दोन संशयित रुग्णांच्या मृत्यूच्या घटनेने जळगाव शहरासह जिल्हा हादरला आहे. दोन्ही रुग्णांचे मृत्यूचे कारण स्पष्ट नाही. तसेच दोन्ही रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल येणे बाकी असल्याचे समजते.

जिल्हा प्रशासन, आरोेग्य यंत्रणा व पोलीस प्रशासन दिवसरात्र एक करुन प्रयत्न करत असताना जळगाव जिल्ह्यात कोरोना हळूहळू हातपाय पसरत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात १२३ कोरोना संशयित दाखल असून त्यापैकी ९४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचेे डीन डॉ.भास्कर खैरेे यांनी २४ तासांपुर्वीच दिली होती यामुळे मोठा दिलासा मिळाला होता. मात्र शनिवारी करोनाची लक्षणे आढळल्याने या दोन्ही रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. त्यांचा उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला आहे. या संशयितांचे स्वॅब कालच तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. परंतु, अद्याप तपासणी अहवाल प्राप्त झालेला नसल्याने त्यांच्या मृत्यूचे कारण निश्चित करता येत नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून या दोन्ही तरुणांच्या कुटुंबीयांना होम क्वॉरंटाइन करण्यात येत आहे.