जिल्ह्यातही शिवसेनेकडुन राजकीय समीकरणे बदलाचे संकेत

0

संपर्कप्रमुख डॉ. सावंत यांचा दौरा : संघटनात्मक बांधणी मजबूत करणार


जळगाव – राज्यात महाविकास आघाडीचा पॅटर्न तयार झाल्यानंतर जिल्ह्यातही अशाप्रकारची आघाडी करण्याच्या हालचाली शिवसेनेने गतीमान केल्या असुन या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे संपर्क प्रमुख डॉ. संजय सावंत यांनी आज जळगाव दौरा करीत पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांशी चर्चा देखिल केली. त्यामुळे जिल्ह्यात देखिल आगामी काळात राजकीय समीकरणे बदलाचेच संकेत शिवसेनेने दिले आहे.
शिवसेनेचे संपर्कप्रमुख डॉ. संजय सावंत हे आजपासून दोन दिवस जिल्हा दौर्‍यावर आले आहेत. या दौर्‍यात त्यांनी आज अजिंठा विश्रामगृह येथे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. यावेळी माजी सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, महानगरप्रमुख शरद तायडे, नगरसेवक विष्णू भंगाळे, मनपा विरोधी पक्षनेते डॉ. सुनील महाजन, अमर जैन, दिनेश जगताप उपस्थित होते. या बैठकीनंतर डॉ. संजय सावंत यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर जिल्ह्यात पुन्हा दौरे सुरू झाले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राजकीय समीकरणे कुस बदलत आहे. त्या अनुषंगाने पक्ष संघटनेचा आढावा या दौर्‍यांच्या माध्यमातुन घेतला जात आहे. जिल्ह्यात आगामी काळात होणार्‍या निवडणुकांसंदर्भात राजकीय गणितांची जुळवाजुळव करण्यासाठी पदाधिकार्‍यांशी चर्चा करण्यात आली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपरिषद, महापालिका, जिल्हा बँक याठिकाणी शिवसेनेचे प्राबल्य वाढविण्यासाठी आवश्यक त्या बाबी कराव्या लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या लवकरच

राज्यात सत्ता स्थापनेनंतर खातेवाटपाची प्रक्रिया पुर्ण करण्यात आली आहे. खातेवाटपानंतर आता जिल्हानिहाय पालकमंत्र्यांच्या नियुक्त्याही दि. 24 डिसेंबरपर्यंत केल्या जातील असे डॉ. संजय सावंत यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेला मंत्रीपदासह इतर आणखीही काही दिले जाण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली.

भाजपातील नाराजांवर नजर

विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने शिवसेनेचे उमेदवार पाडण्यासाठी धनशक्तीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. मात्र शिवसेनेच्या मतदाराने धनशक्तीचा पराभव करून आसमान दाखविले. भारतीय जनता पार्टीत अनेक जण नाराज आहेत. अशा नाराजांवर शिवसेनेची नजर आहे. राजकारणात कुणीही अस्पृश्य नसतो असे सांगत डॉ. संजय सावंत यांनी अनेक जण संपर्कात असल्याचा गौप्यस्फोटही पत्रकारांशी बोलतांना केला.