जिल्ह्यात उद्यापासून महासमृध्दी महिला सक्षमीकरण अभियान

विविध उपक्रमांचा समावेश; पालकमंत्र्यांचे मार्गदर्शन

जळगाव (प्रतिनिधी) – राज्य शासनाच्या निर्णयानुसार राज्यभरात जागतिक महिला दिनाचे औचीत्य साधून ८ मार्च ते ५ जून २०२१ या कालावधी महासमृध्दी महिला सक्षमीकरण अभियान राबविण्यात येत असून जिल्ह्यातील या अभियानास उद्यापासून प्रारंभ होत आहे. याच्या अंतर्गत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी व जागतीक महिला दिनानिमित्त स्वयं सहाय्यता समुहाच्या चळवळीची यशस्वी वाटचाल साजरी करण्यासाठी दिनांक ८ मार्चपासुन महाराष्ट्र शासनाने सर्व विभागांचे सहकार्य घेऊन महासमृध्दी महिला सक्षमीकरण राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सदर अभियानाचा शुभारंभ दिनांक ८ मार्च रोजी होणार असुन अभियान काळात शासनाच्या विविध योजनांचा कृतीसंगम करुन महिला सक्षमीकरणाचे महत्वाचे काम करण्यात येणार आहेत. याच्या अंतर्गत राज्यातील ग्रामीण महिलांना स्वयं सहाय्यता समूहांव्दारे संघटीत करणे व ग्रामसंघ आणि प्रभागसंघच्या माध्यमातून त्यांचे संघटन अधिक मजबूत करणे. सर्व महिलांची दशसूत्रीव्दारे संघटनाबरोबर आरोग्य, पोषण., स्वच्छता. शिक्षण,जीवन कौशल्ये आदीं बाबत महिती व प्रशिक्षणाव्दारे क्षमता बांधणी करणे शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन करणे, त्यांना शासकिय सेवा सुविधांचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करणे महिलांच्या आर्थिक, सामाजिक तसेच सर्वांगीण विकासास चालना देऊन त्यांना गावाच्या विकासात सहभागी करुन मुख्य प्रवाहात आणणे. आणि याकामी शासनाच्या सर्व संबंधित विभागाबरोबरच समाजाच्या प्रत्येक घटकास सक्रीय सहभागी करुन महिला सक्षमीकरणाची एक लोक चळवळ उभी करण्यात येणार आहे. महासमृध्दी महिला सक्षमीकरण अभियानात स्वयं सहाय्यता बचत गट, गटांचा ग्रामसंघ , तसेच ग्रामसंघाचे फेडरेशन (प्रभाग संघ) यांचे माध्यमातून महिलांच्या सक्षम संस्था निर्माण करण्यात येणार आहेत. महिलांना पायाभूत प्रशिक्षण व उद्योजकता विकासासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांची क्षमता बांधणी करण्यात येईल. महिलांचे उपजीविकेचे स्त्रोत वाढविण्यासाठी त्यांच्या विविध संस्थाना खेळते भांडवल, बीज भांडवल व मुलभूत सुविधा निधी सोबतच कर्ज व अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. तर, महिलांच्या संस्थांनी उत्पादित केलेल्या उत्पादनाचे मार्केटिंग
करण्यासाठी मदत करण्यात येईल. यासोबत महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनाचे विक्रीची व्यवस्था करण्यासाठी वस्तु साहित्याचे प्रदर्शन, कॉप-शॉप, सहकारी व कार्पोरेट मॉलमध्ये विक्रीची संधी उपलब्ध करुन देणे. स्वयं सहाय्यता गटांना विविध शासकिय कार्यालये संस्था तसेच पंचायत राज संस्था यांना सेवा व साहित्य पुरवठा करण्यासाठी सामजंस्य करार करुन संधी उपलब्ध करुन देणे. बेरोजगार युवक-युवतींना विविध योजना अंतर्गत प्रशिक्षण स्वयंरोजगारांच्या संधी उपलब्ध करुन देणे. विविध योजनांचा महिलांना प्राधान्याने लाभ मिळवून देणे. महिलांच्या जीवनमानाचा दर्जा उंचाविण्यासाठी अन्न, पोषण, आरोग्य व स्वच्छता या कार्यक्रमांची माहिती महिलांना देऊन त्यांचा सहभाग वाढविणे. सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतीक व विकासाच्या उपक्रमांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून महिलांचा सहभाग वाढविणे. यामध्ये पंचायत राज संस्थामधील निवडून आलेल्या महिलांना प्रशिक्षण देणे. कौटुंबिक मालमत्ता पती – पत्नी या दोघांचे नावाने करणे. स्वयं सहाय्यता गटातील महिलांना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार उपलब्ध करुन देणे, कौटुंबिक हिंसाचारा संदर्भात कायद्याची माहिती देणे या बाबींचा समावेश आहे.या अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी सनियंत्रण व मुल्यमापन करण्यासाठी राज्य विभाग, जिल्हा, तालूका तसेच ग्राम पंचायत स्तरावर विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असुन अभियानाच्या कालायधीमध्य केलेल्या कामाचे
मुल्यमापन करुन विविध स्तरावर शासनाकडून पुरस्कार देण्याचेही प्रस्तावित आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सक्षमीकरणाचे काम यशस्वीपणे सुरू आहे. जिल्ह्यात आजवर सुमारे २१००० स्वयंसहाय्यता गटांची स्थापना करण्यात आली असून ग्रामसंघाचे एकत्रिकरण करुन तालुका पातळीवर/प्रभाग पातळीवर प्रभागस्तरीय संघ करण्यात येत आहे.
महिला सक्षमीकरणात जिल्हा अग्रेसर राहणार- ना. गुलाबराव पाटील
सद्यास्थितीत जिल्ह्यात स्वयं सहाय्यता बचत गटांचे एकूण २८२ ग्रामसंघ व एकूण १९ फेडरेशन स्थापन करण्यात आलेले आहेत. जिल्हातील एकुण ११५३ ग्रामपंचायती मधील बचत गटांनी विविध प्रकारच्या वस्तु उत्पादित केल्या असुन या उत्पादनाचे ब्रॅडिंग पॅकेजिंग करुन, प्रदर्शने व विक्रीची व्यवस्था करण्यासाठी गाव पातळीवरील दुकान गाळे तसेच तालुका स्तरावर प्रदर्शन व विक्री केद्रामध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. सदर अभियानाच्या माध्यमातून जळगांव जिल्हयातील स्वयं सहाय्यता बचत गटांची चळवळ अधिक बळकट करण्यात येऊन महिला सक्षमीकरण करण्यात जळगाव जिल्हा अग्रेसर राहील अशी अपेक्षा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे.