जि.प.बांधकाम विभागात एसीबीच्या कारवाईची हॅट्रीक

0

जळगाव- पेन्शन फाईलमधील त्रुट्यांची पुर्तता करून सदर पेन्शन फाईल पुढे पाठविल्याच्या मोबादल्यात जिल्हा परिषद बांधकाम विभागातील सेवानिवृत्त तक्रारदारराकडून 3000 हजाराची लाच स्विकारणार्‍या याच विभागातील वरिष्ठ लिपिक देविदास ओंकार सोनवणे, वय-57, रा.वाघ नगर याला शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. सापळा लावला असताना पंचाने हात वर करताच पथकाने ही कारवाई केली. दरम्यान आरोपी वरिष्ठ हा 9 महिन्यानंतर सेवानिवृत्त होणार असल्याची माहिती मिळाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 14 दिवसात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातीलच तीन लाचखोरांवर कारवाई करुन हॅट्रीक नोंदविली आहे.

जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात तक्रारदार नोकरीला होते. नुकतेच सेवानिवृत्त झाले असून पेन्शन सुरु होणे कामी तसेच ती मिळणेकामी त्यांनी प्रस्ताव तयार केला. तक्रारदाराने तो जि.प.बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिक देविदास सोनवणे यांच्याकडे सादर केला. त्यांनी या प्रस्तावात त्रुटी असल्याचे सांगत त्याची पुर्तता करुन प्रस्ताव पुढे पाठविण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून 7 मार्च रोजी 3 हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.

व्यापारी संकुलात स्विकारली लाच
तक्रारदार ठरल्याप्रमाणे पैसे देण्यासाठी जिल्हा परिषदेत पोहचला. याठिकाणी वरिष्ठ लिपिक देविदास सोनवणे जि.प.त नको थोडे पुढे चला असे सांगितले. यानंतर सोनवणे तक्रारदाराच्या दुचाकीवरुन जि.प.पासून काही अंतरावर असलेल्या एका व्यापारी संकुलात गेला. त्याठिकाणी जिन्यावर 3 हजार रुपये स्विकारले. यानंतर तक्रारदारासोबत असलेल्या पंचाने एसीबीच्या पथकाला हात वर करुन पैसे स्विकारल्याचा इशारा करताच पथकातील पोलीस उपअधिक्षक गोपाळ ठाकूर, पोलीस निरिक्षक निलेश लोधी, अशोक अहिरे, मनोज जोशी, शामकांत पाटील, सुनिल शिरसाठ, प्रशांत ठाकूर, प्रविण पाटील,अरूण पाटील, नासीर देशमुख, ईश्वर धनगर यांनी सोनवणे याला अटक केली. त्याच्या विरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जि.प.बांधकाम विभागात एसीबीची हॅट्रीक
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 14 दिवसात जिल्हा परिषदे बांधकाम विभागातीलच तीन लाचखोरांना अटक केली आहे. यात 22 फेब्रुवारी रोजी तक्रारीनुसार 500 रुपयांची लाच मागून ती मिळविण्याच्या प्रयत्न केल्याच्या पुराव्यावरुन कनिष्ठ अभियंता पी.डी.पवार व कंत्राटी शिपाई मंगेश गंभीर बेडीस्कर या दोघांना जि.प.तून अटक केली होती. या कारवाईवरुन जि.प.बांधकाम विभागातील लाचखोरी समोर आली आहे.

लाच मागत असल्यास तक्रार करा
कोणत्याही शासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय जळगावच्या दुरध्वनी क्रं. 0257-2235477, मोबा.क्रं.9607556556, टोल फ्रि क्रं. 1064 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.