जेएनयू आंदोलनाच्या निमित्ताने

0

डॉ. रमा दत्तात्रय गर्गे (कोल्हापूर)

गेले कित्येक दिवस मी एका विचाराने अस्वस्थ आहे. मला ज्या लोकांविषयी आदर वाटतो, ज्यांच्या सामाजिक, वैचारिक क्षेत्रातील कामाचा आदर वाटतो, अशी डाव्या विचारांची मंडळी, अनेक कारणांनी उद्विग्न आहेत. 2014 ला घडून आलेल्या सत्तांतरानंतर एक मोठा बदल झाला. जे बुद्धिजीवी लोक भारताच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्राचे व्यवस्थापन करत होते, त्यांचा डेमोकॅ्रटिक फोरम हळूहळू नाहीसा होऊ लागला. ज्या सत्तेच्या आधाराने त्यांनी भारताचे मन आणि विचार यांच्या दिशेचे सुकाणू स्वतःच्या हातात ठेवले होते, ती हलली. ज्या उजव्या विचाराला प्राणपणाने विरोध केला होता, तो सत्तास्थानी येऊन बसला. हा विचार, बहुलतेला मारक व सांस्कृतिक एकाधिकार निर्माण करणारा आहे. तो केंद्रस्थानी असूच शकत नाही, असे त्यांचे मत पडले. 14 ला लोकांना भुरळ पाडण्यात आली, 19 पर्यंत लोक शहाणे होतील यावर हे लोक विसंबून राहिले. सतत विरोध करत राहिले. या सगळ्या गलबल्यात ते राजकीय नेत्यांनीही तत्त्वासाठी एकत्र यावे, छोटे-छोटे अहंकार सोडावे म्हणून सांगत राहिले. राजकारणी लोकांच्या खर्‍या खोट्या बाबींचा विचार न करता दीर्घकालीन तत्वासाठी त्यांचे समर्थन करीत राहिले. मात्र 2019 येता-येता, त्यांच्या लक्षात येत गेले की, राजकीय लोकांना आपल्या केंद्रस्थ विचारांशी देणेघेणे नाही. ही स्वार्थी, लबाड आणि हावरट प्रवृत्ती आहे. जी केवळ स्वार्थकेंद्री आहे, सत्ताकेंद्री आहे आणि मग ही मंडळी अधिक अस्वस्थ झाली. व्यक्तिगत जीवनात आणि सामाजिक जीवनात अत्यंत निर्मळ असलेली ही सगळी माणसे आज देशभरात अस्वस्थ आहेत. त्यांना बहुसंख्य लोकांचे उजवीकडे झुकणे हे खोटे, उन्मादी आणि अयोग्य वाटत आहे. लोकांनी निवडून दिलेले शासक अयोग्य आहेत हे त्यांचे ठाम मत आहे पण तसे म्हणावे तर लोकशाहीच्या व्याख्येची थट्टा होते हेही त्यांना कळत आहे. या द्वन्द्वात ही मंडळी पडली आहेत. दुर्गाबाई भागवत एका ठिकाणी लिहितात, ‘सामान्यतः व्यक्तिस्वभाव फारसा न्यारा नसतोच. न्यारे असते ते व्यक्तिमात्राचे अनुभवविश्‍व!’ या बुद्धिमान लोकांचे आणि सामान्य जनतेचे अनुभवविश्‍व मूलतः भिन्न आहे. सामान्य माणूस हा मोठमोठ्या विचारवंतांच्या सिद्धांतामागे धावत नसतो, तर तो दैनंदिन जीवनातील व्यवहार सुरळीतपणे चालण्यास महत्व देतो आणि मानवी मूल्ये तो व्यक्तिगत जीवनात जगण्याचा प्रयत्न करीत असतो. बहुसंख्य लोक सत्ताकेंद्री विचाराला निवडत असतात, असे मानणे हा वैचारिक मूर्खपणा आहे. एका निवडणुकीने आता भारतीय लोकशाही, बहुलता धाराशायी होईल, असे वाटून अस्वस्थ असणार्‍यांसाठी माझे एकच सांगणे आहे की, ‘आजवर तुम्ही विरोधी विचाराला, केवळ एकाच बाजूने पाहिले. पूर्वग्रहदूषित मन बाजूला ठेवून या विचाराचे अध्ययन करा, तुम्हाला कळेल गीता आणि गाथा एकच तत्व सांगते!’ तरीही तुम्ही गीतेचा विरोध आणि गाथेचे समर्थन करत रहा. कारण तोच भारतीय स्वभाव आहे पण इतके अस्वस्थ असू नका, की अ‍ॅट एनी कॉस्टचे बोट पकडावे. लोकांना ठरवू द्या! राजकीय पराभवाला वैचारिक पराभव मानू नका. अनेक देशांचा इतिहास हा नावीन्याने प्राचीनतेचा पराभव केल्याचा इतिहास आहे. मात्र भारतात नावीन्य हे प्राचीनेतेचे प्रतीक बनून नेहमी समोर येते. रवींद्रनाथ टागोर जेव्हा अमेरिकेत गेले व तेथील लोकांशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले, वाईट या गोष्टीचे वाटत आहे की, तुम्ही दुःखी आहात हे तुम्हांला जाणवत नाही. भारतात अशिक्षित माणसालाही स्व जाणीव असते. हे आमच्या संस्कृतीचे पाथेय आहे.