जेसीएल टी 20 ला रंगारंग कार्यक्रमांनी जल्लोषात सुरुवात

0 1

पहिल्या दिवशी एम.के. वॉरियर्स व रायसोनी अचिव्हर्स विजयी

तनेश जैन व योगेश तेलंग ठरले सामनावीर

जळगाव – संपूर्ण जिल्ह्यातील क्रीडा प्रकाराला चालना देण्यासाठी जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे आयपीएलच्या धर्तीवर आयोजित करण्यात आलेल्या जळगाव क्रिकेट लीग अर्थात जेसीएल टी20 ची सुरुवात रंगारंग कार्यक्रमाने झाली. पहिल्या दिवशी तीन सामने खेळवले गेले. पहिल्या दोन सामन्यांमध्ये एम.के. वॉरियर्स व रायसोनी अचिव्हर्स हे संघ विजयी झाले. एम.के. वॉरीयर्सचा खेळाडू तनेश जैन व रायसोनी अचिव्हर्सचा खेळाडू योगेश तेलंग हे सामनावीराचे मानकरी ठरले. शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात सायंकाळी या स्पर्धेचेक औपचारिक पध्दतीने उद्घाटन झाले. जेसीएलमध्ये 17 तारखेपर्यंत रंगतदार सामन्यांची मेजवानी बघायला मिळणार असून जेसीएलचा पहिला विजेता कोण होणार याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे.

उद्घाटनावेळी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, जितेंद्र कोठारी, परेश झंवर, प्रेम कोगटा, अमर चौधरी, किरण बच्छाव, यूसूफ मकरा, रजनीकांत कोठारी, अरविंद देशपांडे, अविनाश लाठी, आशिष भंडारी उपस्थित होते. शहिदांना श्रध्दांजली देण्यात आली. यानंतर राष्ट्रगीत झाल्यावर औपचारिक पध्दतीने स्पर्धेचे उद्घाटन झाल्याची घोषणा झाली.

एम के वॉरियर्स विजयाने सलामी
जेसीएलमध्ये सहा दिवसात एकूण अठरा सामने होणार आहेत. पहिल्या दिवशी पहिल्या दोन सामन्यांमध्ये एम.के. वॉरियर्स व रायसोनी अचिव्हर्स या संघांनी विजयी सलामी दिली. पहिला सलामीचा सामना एम.के. वॉरियर्स व वनीरा ईगल्स यांच्यामध्ये रंगला. सुरुवातीला संघ मालक आदर्श कोठारी व किरण महाजन यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांच्या हस्ते टॉस करण्यात आला. एम.के.वॉरियर्सने टॉस जिंकत आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 20 षटकांमध्ये त्यांनी 7 गडी गमावत 170 धावा केल्या. कर्णधार तनेश जैन याने 47 चेंडूंमध्ये 7 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 62 धावा केल्या. सौरभ सिंगने नाबाद राहात 40 चेडूंमध्ये 60 धावा केल्या. वनीरा ईगल्स तर्फे चंदन रणवे याने 4 षटकात 22 धावा देत 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरात खेळतांना वनीरा ईगल्सचा संघ निर्धारीत 20 षटकात 8 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 135 धावाच करु शकला. सिद्धेश देशमुखने सर्वाधिक 55 धावा केल्या. एम.के. वॉरियर्स तर्फे अंकित पटेलने 4 षटकात 15 धावा देत 4 गडी बाद केले. तनेश जैन यानेही 2 गडी टिपले. हा सामना एम.के. वॉरियर्स यांनी 35 धावांनी जिंकला. तनेश जैन हा सामनावीराचा मानकरी ठरला.

रायसोनी अचिव्हर्सने पाडला धावांचा पाऊस
दुसरा सामना रायसोनी अचिव्हर्स व के.के. कॅन्स थंडर्स यांच्यात झाला. रायसोनी अचिव्हर्सने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 20 षटकात 5 बाद 207 धावा केल्या. त्यात योगेश तेलंग याने 30 चेडूंमध्ये सर्वाधिक 56 धावा करत 3 चौकार व 5 षटकार खेचले. तसेच लतिकेश पाटील 42 धावा (2 चौकार व 4 षटकार), प्रतिक नन्नवरे 46 धावा (2 चौकार व 4 षटकार) करत योगदान दिले. के.के. कॅन्स थंडर्स तर्फे अक्षय शर्मा याने 4 षटकात 29 धावा देत 5 बळी टिपले. प्रत्युत्तरात खेळतांना के.के. कॅन्स थंडर्स संघाला निर्धारीत 20 षटकात 8 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 133 धावा करता आल्या. प्रद्युम्न महाजनने सर्वाधिक 52 धावा (5 चौकार व 2 षटकार) केल्या. रायसोनी अचिव्हर्स तर्फे सचिन चौधरीने 3 षटकात 19 धावा देत 3 बळी घेतले. अशफाक शेख व चारुदत्त नन्नवरे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. रायसोनी अचिव्हर्सने हा सामना 74 धावांनी जिंकला. योगेश तेलंग हा सामनावीराचा मानकरी ठरला.

आज होणारे सामने
दि. 13 मार्च 2019 रोजी ही जेसीएल टी 20 मध्ये तीन सामने खेळविले जाणार आहेत. त्यातील पहिला सामना सकाळी 9 वाजता खान्देश ब्लास्टर्स विरुद्ध स्पेक्ट्रम चॅलेंजर्स यांच्यात खेळविला जाणार आहे. दुसरा सामना दुपारी 3 वाजता मॉटेल कोझी कॉटेज स्ट्रायकर्स विरुद्ध सिल्व्हर ड्रॉप हेल्दी मास्टर्स यांच्यात खेळविला जाणार आहे. तिसरा सामना सायंकाळी 7.15 वाजता वनीरा ईगल्स विरुद्ध के.के. कॅन्स थंडर्स यांच्यात रंगणार आहे.

जसराज जोशींच्या गीतांसह तनय, शुभमच्या नृत्याने चैतन्य
पहिल्या दिवशी सायंकाळी प्रसिध्द गायक जसराज जोशी यांनी प्रसिध्द संगीतकार ए.आर.रेहमान यांच्या गीते म्हणून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांना संगीतावर कलाकारांची योग्य साथ मिळाली. आपल्या अनोख्या वेशभुषेमुळे जसराज स्क्रीन तसेच स्टेजवर प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत होते. याचप्रकारे शहरातील सुपर डॉन्सर, तनय मल्हारा व शिवम वानखेडे यांनी वेगवेगळे नृत्याविष्कार सादर करीत स्पर्धेत रंगत आणली.प्रवेश सर्वांसाठी खुला व मोफत आयपीएलच्या धर्तीवर जेसीएलचे जळगावात पहिल्यांदाच आयोजन होत असल्याने जळगावकरांचाही उत्तम प्रतिसाद पहिल्या दिवशी लाभला.

मोठ्या संख्येने जळगावकरांनी स्पर्धेचा लाभ घ्यावा
जेसीएलमध्ये प्रवेश सर्वांसाठी खुला व मोफत ठेवण्यात आलेला आहे. तसेच व्हीआयपी पासेसही मोफत मिळत असून त्या शहरातील रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स, नवजीवन सुपर शॉपची शहरातील चारही दालने, पगारिया ऑटो, सातपुडा ऑटोमोबाईल्स, वसंतस् दि सुपर शॉप, मकरा एजन्सीज्, शहरातील सर्व स्पोर्टस् शॉप, कांताई नेत्रालय आदी ठिकाणी उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील क्रिकेटला चालना देणे हा जेसीएलचा मुख्य उद्देश आहे. खेळाडूंना आपल्याच शहरात संधी उपलब्ध करुन देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जेसीएलचे आयोजन करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे त्याला आंतरराष्ट्रीय स्वरुप देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यामुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील नागरीकांनी उत्तम क्रिकेट बघण्यासाठी, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जेसीएल बघायला मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.