‘टाटा ग्रुप’कडून डॉक्टरांची फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय

0

मुंबई – देशातील करोनाग्रस्तांचा आकडा वाढत असतानाच डॉक्टर आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी कोरोनाविरुध्द रात्रंदिवस लढत आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांना संसर्गाचा धोका असल्याने अशा डॉक्टरांना घरी जाता येत नाही. अशा डॉक्टरांसाठी आता टाटा समूह पुढे सरसावला आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत असलेल्या डॉक्टरांना राहण्यासाठी आणि विश्रांतीसाठी टाटा समूहाने आपल्या फाइव्ह स्टार हॉटेलमधील रुम्स उपलब्ध करुन दिल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच रतन टाटा यांनी करोनाविरुद्ध लढण्यासाठी ५०० कोटी आणि टाटा सन्सकडून एक हजार कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. टाटा सन्सच्या मालकिच्या इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडने (आयएचसीएल) मुंबईतील करोनाग्रस्तांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांसाठी आपल्या पंचतारांकित डॉटेल्सचे दरवाजे उघडले आहेत. टाटा समूहाने एकूण ७ हॉटेल डॉक्टरांसाठी उपलब्ध केली आहेत. यामध्ये ताज महाल पॅलेस, ताज लँड्स एंड, ताज संताक्रूझ, द प्रेसिडेंट, गिंगर एमआयडीसी अंधेरी, गिंगर मडगाव आणि गिंगर नोएडा या हॉटेलांचा समावेश आहे. सध्याच्या या संकटाच्या परिस्थितीमध्ये समाजाप्रती आयएचसीएलची जबाबदारी काय आहे हे आम्हाला पूर्ण जाणीव आहे. म्हणूनच करोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी झटणार्‍या आरोग्य सेवेतील कर्मचार्‍यांच्या राहण्याची सोय आम्ही करत आहोत. मुंबईतील पाच हॉटेलमध्ये डॉक्टरांसाठी रुम उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. आरोग्य सेवेतील कर्मचार्‍यांच्या कामाचा आम्हाला अभिमान आहे. या संकटाच्या प्रसंगी आम्ही त्यांच्या सोबत काम करण्यास तयार आहोत, असे आयएचसीएलच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.