ट्रकच्या समोरच्या चाकाखाली तरुण शिपायाचा मृत्यू

0

महामार्गावरील आहुजानगरजवळ अपघात

पारोळा येथील परिश्रम येथील मतिमंद शाळेत होता जात

लग्नाची सुरु होती बोलणी त्यापूर्वी काळाचा घाला

जळगाव- जळगावात आपल्या बहिणीकडे कार्यक्रमासाठी पंकज पांडुरंग महाजन वय 26 रा. किनगाव याचा दुचाकीसह ट्रकच्या समोरील चाकाखाली आल्याने अपघातात मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली. गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला खाजगी रुग्णालयात हलविले. उपचार सुरु असता दोन तासानंतर 9 वाजता त्याची प्राणज्योत मालवली.

किनगाव येथे पंकज पाडुरंग महाजन हा आई, वडील यांच्यासह राहतो. दोन बहिणी असून त्यांचे लग्न झाले आहे. तर भाऊ किशोर हा विवाहित असून तो नाशिकला कंपनीत कामाला आहे. वडील शेती करतात. पंकजने शिक्षण पूृर्ण केल्यानंतर तो 3 वर्षापासून पारोळा येथील परिश्रम मतिमंद या विना अनुदानित आश्रमशाळेत शिपाई म्हणून कार्यरत होता. पारोळा येथेच भाडे करारावर खोली करुन तो राहत होता.

2 दिवसांपूर्वीच बहिणीकडे कार्यक्रमाला आला
मुंदडा नगर येथे पंकजची मोठी बहिण भारती विनोद महाजन वास्तव्यास आहे. त्याच्याकडे घरगुती कार्यक्रम असल्याने त्यासाठी दोन दिवसांपूर्वीच पंकज पारोळा पारोळा येथून शहरात आला होता. कार्यक्रमानंतर दोन दिवस मुक्काम गेला. यानंतर गुरुवारी तो पुन्हा शाळेत ड्युटी असल्याने दुचाकीने (क्रएम.एच 19 ए.आर.7088) पारोळ्याला जात होता. यादरम्यान महामार्गावर आहुजानगरजवळ पंकज त्याच्या दुचाकीसह अकोल्याहून मुंबई येथे भरधाव वेगाने जात असलेल्या टँकरच्या समोरील चाकाखाली आला.

ट्रकचालकानेच रिक्षातून जखमीला रुग्णालयात हलविले
मुंबई येथील मालक गरीब्बोद्दीन यांच्या मालकीचा डांबरचा कंटेनर आहे. धडक देणारा ट्रकचालक अक्षय सुभाष कुमरे वय 30 रा. अकोला याने महामार्गावरुन जात असलेल्या रिक्षाचालक नरेंद्र कोळी यांच्या मदतीने गंभीर पंकज महाजन यास खॉजामिया चौकाजवळील ओमसाई या रुग्णालयात हलवून माणुसकीचे दर्शन घडविले.

बेंडाळेच्या शिक्षकांनी घेतली रुग्णालयात धाव
पंकजने जखमी अवस्थेत रिक्षाचालक कोळी यास त्याच्या मोबाईलवरुन मुंदडा नगरातील मेव्हणे विनोद भिकन महाजन यांना संपर्क साधून प्रकार कळविण्याचे सांगितले होते. विनोद महाजन हे नंदीनीबाई बेंडाळे या विद्यालयात उपशिक्षक आहेत. माहिती मिळताच महाजन व त्यांचे सहकारी शिक्षक प्रदीप वाणी, मिलींद झोपे, संदीप डोलारे यांनी ओमसाई या खाजगी रुग्णालयात धाव घेतली.

दोन तासांनी उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली
ओमसाई या रुग्णालयात व्हेंल्टीलेटर नसल्याने पंकजला दुसर्‍या रुग्णालयात हलविण्याचा सल्ला तेथील डॉक्टरांनी दिला. त्यानुसार पंकजला शिक्षकांनी रुग्णवाहिकेतून ओम क्रिटीकल केअर येथे हलविले. छातीला जबर मार लागल्याने त्याच्या छातीतील बरगड्यांचे हाड मोडले होते. उपचार सुरु असताना दोन तासानंतर 9 वाजता उपचार सुरु असताना त्याना मृत्यू झाला. रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती.

ट्रकचालक ट्रकसह पोलीस ठाण्यात जमा
अपघातानंतर काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली. माहिती मिळताच पाळधी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक उपनिरीक्षक जाधव यांच्यासह कर्मचारी सोपान पाटील, भागवत धांडे, गजानन पाटील, कपील चौधरी यांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. ट्रकवरील चालक अक्षय कुमरे हा ट्रकसह तालुका पोलीस ठाण्यात जमा झाला होता. याठिकाणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.