तंत्रज्ञानाच्या बळावर शेती उत्पादनात वाढ : कृषीतज्ज्ञ दिलीप वैद्य

0

भुसावळ- ईस्राईलने आपल्यापेक्षा एक वर्ष उशीरा स्वातंत्र्य मिळूनही राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा आणि तंत्रज्ञानाच्या बळावर शेती उत्पादनात प्रचंड वाढ करून कृषिक्षेत्रात जगात मानाचे स्थान मिळविले आहे. त्यामुळे आपणही तंत्रज्ञानाच्या बळावर शेती उत्पादनात वाढ करू शकतो, असे प्रतिपादन रावेर येथील कृषीतज्ज्ञ दिलीप वैद्य यांनी येथे केले. भुसावळ येथील ज्ञानासह मनोरंजन हाच हेतू गृपच्या चौथ्या वर्धापनदिन आयोजित कार्यक्रमात ईस्राईल शेती व तंत्रज्ञान या विषयावर ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती
नाहाटा महाविद्यालयाच्या वाचन कक्षात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदूरबार डिआयईसीपीडीचे अधिव्याख्याता प्रा.अनिल झोपे होते. प्रमुख पाहुणे म्हणून फैजपूर मुख्याधिकारी किशोर चव्हाण, वरणगाव नगराध्यक्ष सुनील काळे, जळगाव बालविश्व विद्या मंदिर संचालिका भारती चौधरी उपस्थित होत्या. प्रास्ताविकात ग्रुपप्रमुख डॉ. जगदीश पाटील यांनी ग्रुपच्या माध्यमातून आतापर्यंत राबविलेल्या विविध अठरा उपक्रमांची डिजीटलरीत्या माहिती सादर केली.

पाण्याचे काटेकोर नियोजन : ईस्त्राईल शेतीचे वैशिष्ट्य
रावेर तालुक्यातील बलवाडी येथील श्री. बा. ना. पाटील माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षक दिलीप वैद्य यांना जळगाव येथील जैन इरिगेशनच्या माध्यमातून इस्त्राईल परदेश दौरा करण्याची संधी मिळाली. त्यांनी इस्त्राईलमधील शेतीचे निरीक्षण व परीक्षण करून केला. त्यांनी या दौर्‍यात अनुभवलेल्या शेतीतील नाविन्यपूर्ण बाबींची माहिती पीपीटीद्वारे सादर करतांना इस्त्राईल शेती व तंत्रज्ञान या विषयावर बोलतांना ते म्हणाले की, पाण्याचे दुर्भिक्ष्य, वाळवंटी जमीन, अत्यंत कमी पाऊस या नैसर्गिक आपत्तीवर मात करून इस्राईलने कृषिक्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. इस्राईलमध्ये कोणत्याही शेतात चारीने किंवा वाफे करून पाणी दिले जात नाही. तिथे 76 टक्के शेतीत ठिबक सिंचन संच आणि उर्वरित 24 टक्के शेतीत तुषार सिंचन संच पद्धतीने पाणी दिले जाते. पाण्याचे काटेकोर नियोजन हे देखील त्यांच्या शेतीचे वैशिष्ट्य आहे. इस्राईलमध्ये समूहाने शेती केली जाते. त्यामुळे मोठ्या क्षेत्रावर शेती होते म्हणून यांत्रिकीकरण करणे शक्य झाले आहे. तेथील शेतकरी आपल्या मनानुसार नव्हे तर देशाच्या आवश्यकतेनुसार पिकांचे नियोजन करतात. इस्राईलमध्ये संगणकाचा, ड्रोनचा वापर करून शेती केली जाते. शेतीत पिकांना विजेचा वापर न करता पाणी देण्याची पद्धत, पॉलिहाऊसचा अधिकाधिक वापर, जैविक कीडनाशके वापरण्याची पद्धत,संगणकाचा जमिनीतील घटक द्रव्ये मोजण्याची पद्धत, ड्रोनच्या सहाय्याने पेरणी, फवारणी आणि रोगांचे निरीक्षण या आधुनिक पद्धतीचा वापर करून इस्त्राईलचे शेतकरी शेती उत्पादन वाढवत असल्याचे वैद्य म्णाले. यावेळी त्यांनी एलसीडी प्रोजेक्टरच्या साहाय्याने इस्राईलमधील शेती, तेथील जागतिक कृषी प्रदर्शनातील फोटो आणि चित्रीकरण दाखविले. सूत्रसंचालन संजीव बोठे यांनी तर आभार डी.के.पाटील यांनी मानले.