…तर जि.प.तील भाजपाची सत्ता कोसळणार

0

आघाड्या तोडण्याच्या आदेशावर जिल्ह्यातील नेत्यांचे ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’

जळगाव (चेतन साखरे)। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आघाड्या तोडण्याचे फर्मान काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सोडले आहे. यामुळे काँग्रेसच्या पाठिंब्यावर जळगाव जिल्हा परिषदेत स्थापन झालेली भाजपाची सत्ता कोसळू शकते. दरम्यान जिल्हास्तरावर अद्याप आदेश नसल्याने जिल्ह्यातील नेत्यांनी वेट अ‍ॅण्ड वॉचची भूमिका घेतली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राज्यस्तरावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 18 रोजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यात भाजपा किंवा शिवसेनेशी असलेल्या आघाड्या तातडीने तोडण्याचे फर्मान सोडले आहे.

जिल्हा परिषदेत काँग्रेस भाजपासोबत काडीमोड घेणार?
जिल्हा परिषदेत सद्यस्थितीला भाजपाचे 33, शिवसेनेचे 14, राष्ट्रवादी काँग्रेसचे 16 आणि काँग्रेसचे 4 सदस्य आहेत. यातील काँग्रेसच्या चार सदस्यांच्या पाठींब्यावर भाजपाची सत्ता स्थापन आहे. या पाठींब्यापोटी काँग्रेसला जिल्हा परिषदेत एक सभापतीपदही देण्यात आले आहे. आता मात्र, राज्यस्तरावर आघाड्या तोडण्याचे आदेश झाल्याने काँग्रेस पक्ष सत्तेतून बाहेर पडणार का? असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

भाजपाची सत्ता कोसळण्याची शक्यता
जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतर जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यांना नाट्यमयरित्या गैरहजर दाखवून काँग्रेसच्या टेकूवर सत्ता काबीज केली. आता काँग्रेसने पाठींबा काढल्यास जिल्हा परिषदेतील भाजपाची सत्ता कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

“राज्यस्तरावर झालेल्या आघाडी तोडण्याच्या निर्णयाचे लेखी आदेश अद्याप जिल्हास्तरावर प्राप्त झालेले नाही. आम्ही पक्षाचे सैनिक आहोत. पक्ष जो आदेश देईल तो आम्ही पाळत असतो. त्यामुळे आदेश आल्यानंतर त्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल.”
                                                                                                                       -अ‍ॅड. संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष काँग्रेस

“लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाकडून धोरणात्मक निर्णय घेतले जातात. जिल्ह्यात राष्ट्रवादीची सेना किंवा भाजपासोबत कुठलीही आघाडी नाही. तरी स्थानिक ठिकाणी काही अशा आघाड्या असतील तर पक्षादेशाची आम्ही अंमलबजावणी करू”.
                                                                                                          – अ‍ॅड. रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस