तिकीट कापण्यामागे जिल्हाध्यक्षांचे षडयंत्र

0

भाजपाचे खा. ए. टी. पाटील यांचा खळबळजनक आरोप

जळगाव – ‘गेल्या दोन पंचवार्षिकपासून खासदार म्हणून चांगले काम करूनही माझे तिकीट कापले गेले. तिकीट कापण्यामागे भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे षडयंत्र कारणीभूत आहे,’ असा खळबळजनक आरोप खा. ए. टी. पाटील यांनी ‘जनशक्ति’शी बोलतांना केला.

भाजपाचे विद्यमान खा. ए. टी. पाटील यांची या वेळेच्या निवडणुकीत हॅट्रीक होता होता राहिली. जळगाव मतदारसंघातून भाजपाने त्यांचे तिकीट कापून जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पत्नी आ. स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्यामुळे खा. ए. टी. पाटील पक्ष नेतृत्वावर कमालीचे नाराज झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून भारतीय जनता पार्टीसह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खा. ए. टी. पाटील यांचे तिकीट का कापले गेले? याविषयीची जोरदार चर्चा होत आहे.

दरम्यान रविवारी, खा. ए. टी. पाटील यांनी पारोळा येथे पत्रपरिषद घेतली. यावेळी त्यांनी 26 मार्च रोजी पारोळा येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून, या मेळाव्यात आपण आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले. पत्रपरिषदेस भाजपाचे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, बजरंग अग्रवाल, तालुकाध्यक्ष अतुल पाटील, सुरेंद्र बोहरा आदी उपस्थित होते.

जिल्हाध्यक्षांनी अशी कुठली जादू केली की, त्यामुळे त्यांच्या पत्नीला उमेदवारी मिळाली?

खा. ए. टी.पाटील यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यावर प्रचंड रोष व्यक्त केला आहे. माझे तिकीट कापण्यामागे त्यांचे षड्यंत्र असल्याचा आरोप खा. पाटील यांनी ‘जनशक्ति’शी बोलतांना केला. तसेच अशी कुठली जादू केली की, जिल्हाध्यक्षांच्या पत्नीला उमेदवारी मिळाली? असा उद्वीग्न सवालही त्यांनी उपस्थित केला. 26 रोजी कार्यकर्त्यांशी बोलून भूमिका जाहीर केल्यानंतर पक्षनेतृत्वाकडे याविषयी चर्चा करणार असल्याचेही खा. पाटील यांनी सांगितले.

भाजपासाठी धोक्याची घंटा

विद्यमान खा. ए. टी. पाटील यांनी भाजपाच्या उमेदवाराविरोधात बंड पुकारल्यास भाजपासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. तसेच जिल्हाध्यक्षांवर त्यांनी केलेल्या आरोपामुळे जिल्हा भाजपात मोठी खळबळ उडाली आहे.