भुसावळ पालिकेची बेकायदेशीर सभा रद्द करावी

0

माजी आमदार संतोष चौधरी : भुखंडांवरील आरक्षण उठवण्यामागे नगराध्यक्षांचे गौडबंगाल

भुसावळ : चार महिन्यानंतर बुधवारी भुसावळ पालिकेत झालेली सर्वसाधारण बेकायदा असून केवळ नऊ विषय वाचण्यात आल्याने याच विषयांना मंजुरी द्यावी अथवा संपूर्ण सभा रद्द करावी, अशी आमची प्रमुख मागणी असून या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी केली जाईल व जिल्हाधिकार्‍यांनी स्वतःहून दखल घेवून सुमोटो दाखल करून घेत नगराध्यक्षांना अपात्र करावे शिवाय भुसावळातील आरक्षित जमिनीवरील आरक्षण हटवण्यामागे नगराध्यक्ष रमण भोळे यांचे मोठे आर्थिक गौडबंगाल असल्याचा आरोप माजी आमदार संतोष चौधरी यांनी पत्रकार परीषदेत केला. बुधवारी सायंकाळी सियाराम कॉम्प्लेक्समधील कार्यालयात त्यांनी पत्रपरीषदेत संवाद साधला.

फुटेज तपासून सभा करावी रद्द
माजी आमदार चौधरी म्हणाले की, अवघ्या दहा मिनिटात सभा आटोपण्यात आली मात्र केवळ नऊ विषयांचे वाचन झाले असून तसे फुटेज जिल्हाधिकार्‍यांनी तपासावेत या मागणीसाठी जिल्हाधिकारी व मुख्याधिकार्‍यांना निवेदन दिले जाणार आहे. राष्ट्रवादीची गटनोंदणी झाली असून दुर्गेश ठाकूर आता गटनेता असून को.ऑपचे नगरसेवक म्हणून शेख शकील शेख (तम्मा पहेलवान) यांची निवड झाल्याचे ते म्हणाले. नगराध्यक्षांकडून आरक्षण हटवण्यामागे मोठे आर्थिक गौडबंगाल सुरू असून अशोक नारायण भोळे हे नगराध्यक्षांचे नातेवाईक असून 127 ची नोटीस देवून आरक्षण वगळण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहरात आरक्षण वाढणे गरजेचे असताना ते मात्र कमी केले जात असल्याचे ते म्हणाले.

भुसावळात गटारींचा घोटाळा
शहरासाठी अमृत योजना मंजूर असतानाही गटारींची कामे केली जात आहे व त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला जात आहे मात्र या सर्व प्रकारांच्या चौकशीची मागणी करण्यात येईल शिवाय अमृत योजनेंसंदर्भातही तक्रार करण्यात आली असून या योजनेंतर्गत भुयारी गटारी केल्या जाणार असताना जनतेच्या पैशांचा नगराध्यक्ष अपव्यय करीत असून या संदर्भातील झालेला खर्च त्यांच्या प्रॉपर्टीवर बोजे बसवून वसुल केला जाईल, असेही चौधरी यांनी सांगत त्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे ते म्हणाले. नागरीकांना कुठल्याही सुविधा नाहीत, रस्तेदेखील नाहीत, असे असताना घरपट्टीत 360 रुपये घनकचरा फी आकारली जात असल्याने ती रद्द करावी, अशी मागणी असल्याचे ते म्हणाले. भुसावळ पालिकेला थ्रीस्टार नामांकन म्हणून शहरवासीयांची ही एकप्रकारे थट्टा असून सत्ताधारी मीठ चोळण्याचे काम करीत असल्याचे ते म्हणाले. मागच्या वेळीदेखील मॅनेज करून पुरस्कार मिळवण्यात आल्याचा त्यांनी दावा केला. विशेष सभा सर्वसाधारणमध्ये कायम करता येत नाही तसेच विषय क्रमांक एक व दोनला हरकत असल्याचे ते म्हणाले.

यांची होती उपस्थिती
पत्रकार परीषदेला बाजार समिती सभापती सचिन चौधरी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष नितीन धांडे, गटनेता दुर्गेश ठाकूर, नगरसेवक उल्हास पगारे, आशिक खान शेर खान, राहुल बोरसे, सचिन पाटील, निखील भालेराव आदींची उपस्थिती होती.