तोडीस तोड उत्तर !

0

अमित महाबळ

राज ठाकरे यांच्या सभेमुळे जी वातावरण निर्मिती झाली ती महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे. या निमित्ताने भाजपाला नवा मित्र महाराष्ट्रात लाभला आहे हे जरी खरे असले तरी राज ठाकरे यांच्या आजवरच्या बदलत्या भूमिका लक्षात घेता ते पुढील 10 वर्षे तरी भाजपासोबत राहतील का? सध्या देशात फक्त दोन भूमिकांमधून पाहिले जाते. सरकारवर टीका केली तर भाजपविरोधी, अभिनंदन केले तर भाजप समर्थक पण त्यापलीकडे ठोस भूमिकाही असते आणि तीच मनसेने घेतली आहे, असे राज म्हणाले आहेत. त्यांना संतुलित राहणे अपेक्षित असावे. यातून भाजपानेही योग्य तो बोध घ्यायला हवा.

गेले बरेच दिवस देशभरात चर्चेत असलेला मनसेचा महामोर्चा रविवारच्या दिवशी मुंबईत निघाला. यातील मनसैनिकांचे संख्याबळ नजरेत भरण्यासारखे होतेच, त्याच बरोबरीने राज ठाकरे यांचे भाषणदेखील तोडीस तोड ठरल्याचे म्हणावे लागेल. राज्यातील सत्तापालट, राज ठाकरे यांच्या भूमिकेत झालेला बदल, सीएए आणि एनआरसीच्या मुद्यावरून राज्यामध्ये तापलेले वातावरण अशा परिस्थितीत पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात राज ठाकरे यांच्या मोर्चाला परवानगी मिळणार किंवा नाही हा प्रश्न सुरुवातीपासून अनेकांच्या मनात होता. हिंदू जिमखाना ते आझाद मैदानपर्यंत महामोर्चा काढण्यास त्यांना परवानगी दिली. मनसेच्या बदलत्या भूमिकेला अनुसरून या मार्गाचे आरंभस्थळ ‘हिंदू’ जिमखाना हे साजेसे ठरले. मनसेचे पालटलेले रुप ह्या महामोर्चात बघायला मिळाले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवरायांची राजमुद्रा असलेला झेंडा मोर्चात प्रथमच झळकला. मोर्चाच्या समारोपानंतर राज ठाकरे यांचे झालेले भाषण टाळ्या घेऊन तर गेलेच, याशिवाय अनेकांना निर्वाणीचा इशारा देऊन गेले आहे. या मोर्चामुळे शिवसेना व मनसेची राजकीय तुलनाही सुरू झाली आहे. सीएए व एनआरसीच्या मुद्यावरून केंद्रातील भाजपा सरकारच्या म्हणजेच मोदी व शहा यांच्या विरोधात देशातील विरोधक एकवटले असताना महाराष्ट्रात मात्र, मनसेने केंद्र सरकारला सहाय्यकारी भूमिका घेतली आहे.

राज ठाकरे यांनी हे दोनही कायदे कठोरपणे राबविण्याची मागणी मोर्चानंतर झालेल्या जाहीर सभेतून केली. मनसेचे अशा तर्‍हेने भाजपाच्या जवळ जाणे येत्या काही वर्षात शिवसेनेसाठी कदाचित अडचणीचे ठरू शकते. प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी शिवसेना गेल्या वर्षी सरकार स्थापनेसाठी आपली पूर्वीची भूमिका मवाळ करत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पंगतीत जाऊन बसली तर हिंदुत्वाच्या राजकारणात सुयोग्य मित्राची भाजपाची गरज ओळखून मनसेने संधी साधली आहे. त्यांनी हिंदुत्वाचा नारा दिला आहे. त्याचा थेट फायदा मनसेला किती होईल हे लवकरच दिसेल. विशेष म्हणजे, शिवसेना आणि भाजपामधील युद्ध पाहता मनसे हा पक्ष मोठा झालेला भाजपाला नक्कीच आवडेल हे खरे असले तरी नजीकच्या दिवसात कोणतीही मोठी निवडणूक नाही. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार फार दिवस टिकणार नाही हेही सांगणारे अंदाजवजा गोपनीय अहवाल चर्चेत आहेत. घुसखोरांचा मुद्दा एकेकाळी शिवसेनेने आक्रमकपणे लावून धरला होता पण काँग्रेस व राष्ट्रवादीशी घरोबा केल्यामुळे उद्धव ठाकरे यांची अडचण झाल्याचे दिसते. त्यामुळेच की, काय? ते सीएए आणि एनआरसी समर्थनार्थ आक्रमक भूमिका घेऊ शकले नसल्याचे दिसून आले आहे. राज ठाकरे यांनी शिवसेनेची झालेली अडचण ओळखून महामोर्चाचा मुहूर्त साधला असावा, असेही म्हणता येऊ शकते. त्यामुळे मनसेच्या महामोर्चावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व हे बाळासाहेबांचे आहे. ते सिद्ध करण्याची आपल्याला गरज नाही या स्वरुपाचे वक्तव्य केले आहे. शिवसेनेच्या गोटात राज ठाकरे हे ‘बेदखल’ राहू शकलेले नाहीत. यापेक्षा वेगळे अजून काय सांगायला हवे? राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून सीएए आणि एनआरसी देशात सर्वत्र राबविण्याची ठाम मागणी केंद्राकडे केली आहे. पाकिस्तानी व बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढण्याच्या मुद्यावर देश साफ करायला हवा हे त्यांचे म्हणणे भाजपा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भूमिकेशी तंतोतंत जुळणारे आहे. काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मनसे प्रमुख राज ठाकरे यांची एक गोपनीय बैठक झाली होती.

तेव्हापासूनच राज ठाकरे हे भाजपाच्या सोबत जातील, अशी चर्चा होतील. राज ठाकरे यांच्या भाषणाच्या निमित्ताने ही चर्चा वास्तवात उतरल्याचे चित्र निर्माण झाले आहे. केवळ केंद्राचे समर्थनच नव्हे, तर राज ठाकरे यांनी इतरही बाण आपल्या भात्यातून सोडले आहेत. प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेताना त्यांनी अस्सल भारतीय मुस्लिमांना जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे. वर्षानुवर्षे भारतात राहणार्‍या, इथेच जन्म झालेल्या, भारतावर आपला देश म्हणून प्रेम करणार्‍या मुस्लिमांवर विश्वास दाखवत देशासाठी त्यांनीही जागरूक राहावे, अशी साद घातली आहे. भारतात राहणारा तो हिंदू ही भाजपा परिवाराची व्याख्या आहे. त्या अनुरूप भूमिका राज ठाकरे यांनी घेतली असल्याचे आज दिसून आले. त्याला त्यांनी राष्ट्रवादाची जोड दिली आहे. हा वैचारिक, तात्विक योगायोग म्हणावा का? देशातील घुसखोरांची समस्या मोठी आहे. त्याची दाहकता उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, पश्चिम बंगाल यासारख्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या घटनांच्या माध्यमातून अधिक प्रकर्षाने जाणवत राहते. त्यामुळे या समस्येची संवेदनशीलता ज्यांना ठाऊक आहे त्यांना भारत म्हणजे काही धर्मशाळा नाही हे राज ठाकरे यांचे वाक्य नक्कीच मनाला भिडणारे ठरेल.

सीएए व एनआरसीच्या विरोधात देशात मोर्चे निघत आहेत. ते खरोखर देशाच्या बाजूने आहेत का? त्यांना सीएए कळला आहे का? या आंदोलनांमध्ये विशिष्ठ समुदाय आणि त्यांचे ठराविक नेतेच का दिसतात? कायद्यातील दुरुस्ती नागरी हितात नव्हती, तर देशातील 100 टक्के जनता पेटून उठायला हवी होती. तसे घडलेले नाही. परदेशातून मिळणार्‍या निधीचा लाभ घेत भारतामधील सामाजिक सौदार्ह बिघडविणार्‍या, एकोप्याला बाधा आणणार्‍या काही संस्थांची दुकानदारी 2014 नंतर उघड झाली. तेव्हापासून या संस्थांना टाळे लागले आहे. आताही सीएएविरोधातील आंदोलनांना कशा पद्धतीने बाहेरून वित्तपुरवठा झाला हे उत्तर प्रदेश पोलिसांनी उघड केले आहे. राज ठाकरे यांच्या सभेमुळे जी वातावरण निर्मिती झाली ती महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे. या निमित्ताने भाजपाला नवा मित्र महाराष्ट्रात लाभला आहे हे जरी खरे असले तरी राज ठाकरे यांच्या आजवरच्या बदलत्या भूमिका लक्षात घेता ते पुढील 10 वर्षे तरी भाजपासोबत राहतील का? सध्या देशात फक्त दोन भूमिकांमधून पाहिले जाते. सरकारवर टीका केली तर भाजपविरोधी, अभिनंदन केले तर भाजप समर्थक पण त्यापलीकडे ठोस भूमिकाही असते आणि तीच मनसेने घेतली आहे, असे राज म्हणाले आहेत. त्यांना संतुलित राहणे अपेक्षित असावे. यातून भाजपानेही योग्य तो बोध
घ्यायला हवा.