‘त्या’ आदेशामुळे शालेय शिक्षकांना ताप

0

जळगाव – कोरोनामुळे केंद्र सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन केले आहे. मात्र शासनाच्या विविध खात्यात समन्वय नसल्याने त्याचा ताप शालेय शिक्षकांना होत आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव यांनी दिनांक 27 मार्च 2020 रोजी काढलेल्या आदेशातून हे दिसून आले आहे.
राज्याच्या ग्रामीण भागातील शाळा स्तरावर शिल्लक असलेला तांदूळ आणि डाळी व कडधान्ये विद्यार्थ्यांना वितरित करावे, असे या आदेशात म्हटले आहे. त्यासाठी प्रथम शाळांनी प्रसिद्धी करावी, गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, विद्यार्थी /पालक आजारी असल्यास त्यांचे धान्य घरपोच करावे. तसेच जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी दिलेले आदेश व सूचनांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी. शाळा स्तरावर धान्य वाटप करण्यात येणार आहे याची त्यांना पूर्व कल्पना देऊन त्यांची परवानगी घ्यावी. असे उपसचिव यांनी आदेशात म्हटले आहे.
मात्र आदेश काढण्यापूर्वी आजची परिस्थिती त्यांनी लक्षात घेतलेली दिसत नाही. 1)राज्य सरकारने 31 मार्च पर्यंत सर्व शाळा बंद चे तर केंद्र सरकारने 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे शाळेत कोणताही कर्मचारी उपस्थित नाही. एवढेच नव्हे तर शाळेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बोलल्यास मुख्याध्यापक वर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असेही आदेश आहेत. अश्या वेळी धान्य वितरित तरी कसे करणार? 2)जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची परवानगी तरी मिळेल का? एक तर आधीच त्यांच्यावर प्रचंड ताण आहे. अपूर्ण मनुष्यबळ, प्रचंड धावपळ हे लक्षात घेता ते परवानगी देतील? 3) गर्दी टाळायचे नियोजन केले तरी आपल्याकडील नागरिकांमध्ये असलेली बेजबाबदार वृत्ती, बेशिस्तपणा लक्षात घेता पालकांनी /विद्यार्थ्यानी गर्दी केली तर त्यावर एकटे मुख्याध्यापक नियंत्रण कसे ठेऊ शकतील? डाळी, कडधान्ये यांचे प्रति विद्यार्थी प्रमाण 20 /30 gm असे आहे व त्यांचे प्रकार ही पुष्कळ आहेत मग हे एकटा मुख्याध्यापक कसे करील? 4)अनेक जिल्ह्यात गाव बंदी आहे, रस्ते बंद, वाहतुक बंद, संपर्क साधावा तरी कसा? व साधला तरी पालक थोड्याश्या धान्यासाठी लांब अंतरावरील गावागावातून येतील तरी कसे? 5)जमाव बंदी, संचारबंदी, घराबाहेर निघणार्‍या ना पोलिसांचा चोप, असे सर्वत्र चित्र आहे. पंतप्रधान यांच्यापासून सर्व जण नागरिकांनी घराबाहेर पडू नका असे कळकळीचे आवाहन करीत आहे, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मोडल्यास गुन्हे दाखल झाल्यास, जबाबदार कोण? ऐकावे तरी कोणाचे? असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे. एकंदरीत हा सर्व प्रकार हास्यास्पद असल्याचे शिक्षक संघटनेचे जेष्ठ नेते प्र. ह. दलाल यांनी म्हटले आहे.