थाळनेरला पाया खोदतांना सापडली सोन्याच्या दागिण्यांनी भरलेली कळशी

0 1

शिरपुर :- तालुक्यातील थाळनेर येथे घराचा पाया खोदत असताना मजुराला सुमारे 5 किलो सोन्याचे दागिण्यांनी भरलेली कळशी सापडल्याची घटना दोन ते तीन महिन्यांपूर्वी घडली होती. मजुराकडून पोलिसांनी एैवज ताब्यात घ्यावा व सरकारी खजिन्यात जमा करावा, अशी लेखी तक्रार आधार बुधा मराठे यांनी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांकडे केली होती.त्यानुसार शिरपूर पोलिसांनी मजुराकडून 59.060 ग्रॅम वजनाचे 17 सोन्याचे नाणे व 502 ग्राम वजनाचे चांदीचे दागिने व तांब्याचा कळस असा एैवज ताब्यात घेतला असून त्याची तपासणी केली असता दागिणे सोन्याचे असल्याची माहिती मिळाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, थाळनेर येथील बाजार पेठेत राहणार्‍या आधार बुधा मराठे यांना शासना मार्फत प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल योजनेचा त्याना लाभ मिळाला आहे. त्यांची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे त्यांनी बाजार पेठेतील स्वतःच्या मालकीच्या जागेवर घराच्या पायाचे खोदकाम सुरु केले होते. त्यांनी सहा पैकी दोन पायांचे खोदकाम मुलगा व नातूसह स्वतःच केले परंतु कामास उशीर होत असल्यामुळे उर्वरित चार पायांचे खोदकाम गावातील मजूर राकेश सुभाष सावळे व दिलीप दशरथ भोई यांना दिले.

वडीलोपार्जित असल्याचा मराठेंचा दावा
मजूर राकेश सावळे व दिलीप भोई यांना पाया खोदकाम करत असताना त्यांना चार फुटावरच सोन्याने भरलेली कळशी असल्याचा संशय आल्याने त्यांनी दिवस असल्याने त्या पायाचे खोदकाम अपूर्ण सोडले व दुसर्‍या दिवशी खोदकाम करू असे सांगितले. दुसर्‍या दिवशी खोदकाम करत असतांना राकेश सावळे यास आमच्या वडिलोपार्जित सोन्याचे दागिने व शिक्के भरलेली कळशी सापडली. मी खड्यात उतरू त्याच्या अगोदर राकेश सावळे याने कळशी टोपलीत टाकून त्यावर माती टाकून घेतली व पसार झाला, असे आधार मराठे यांचे म्हणणे आहे.

मजुराच्या दादागिरीमुळे केली तक्रार
राकेश सावळे यास घर मालकाने अनेक वेळा विचारा असता तो दादागिरी करत होता त्यामुळे आम्ही घाबरून पोलिसात उशिरा तक्रार दिली.तरी त्याच्या कडून सर्व दागिने हस्तगत करून सरकारी खजिन्यात जमा करावी.राकेश सावळे याने तीन महिन्यात 50 ते 60 लाखाचा आर्थिक व्यवहार केले आहेत. त्यामुळे आधार मराठे यांनी थाळनेर पोलिसात तक्रार केली आहे असून त्या तक्रारीची प्रत जिल्हाधिकारी धुळे व जिल्हा पोलीस अधीक्षक धुळे यांना दिली.

सोन्या, चांदीचे नाणे, तांब्याचा कळस ताब्यात
मजुर राकेश सावळे याने सदर सोने मध्यप्रदेशातील खेतिया येथे विकले असून त्याने गेल्या तीन महिन्यांत 50-60 लाखाचा आर्थिक व्यवहार केल्याची गावात चर्चा होती. मराठे यांनी केलेल्या लेखी तक्रारीनुसार शिरपूर पोलिसांनी राकेश कोळी याच्या कडून 59.060 ग्रॅम वजनाचे 17 सोन्याचे नाणे व 502 ग्राम वजनाचे चांदीचे दागिने व तांब्याचा कळस ताब्यात घेतला आहे. तत्पूर्वी शिरपुर येथील एका सोनाराकडून दागिन्यांची तपासणी केली असून ती नाणी सोन्याची असल्याची माहिती मिळाली आहे. उर्वरीत एैवज मजुराने कुठे लपविला अथवा विकला याबाबतही प्रश्‍न अनुत्तरीत आहे.