थेरगावचा केजुबाई बंधारा जलपर्णीच्या विळख्यात; नदीत सोडण्यात येणारे सांडपाणी थांबविण्याकडे प्रशासनाचा ‘कानाडोळा’

0

पिंपरी : थेरगाव येथील केजुबाई बंधारा या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात जलपर्णी आल्याचे आढळून आले आहे. केजुबाई बंधारा ते थेरगाव गणपती विसर्जन घाट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जलपर्णी आल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. यामुळे पाण्यातील ऑक्सिजनची पातळी खालावली असून नदीमध्ये असलेली जलचर सृष्टी, मासे आणि इतर जलचर प्राणी यांचे जीवन धोक्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी यामुळेच मासे मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडल्याचे आढळले होते. नदीत थेट सोडण्यात येणार्‍या सांडपाण्यामुळे बंधार्‍याला हा जलपर्णीचा विळखा पडला असून महापालिका प्रशासनाचा याकडे कानाडोळा होत असल्याचा आरोप होत आहे.

या वाढत असलेल्या जलपर्णीकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा आरोग्य विभाग व पर्यावरण विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे केजुबाई उद्यान येथे येणार्‍या पर्यटकांनी सांगितले. याबाबत अधिकची माहिती घेतली असता नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे काम महानगरपालिकेने निविदेद्वारे काढले असून संबधित ठेकेदाराला जास्तीच्या रकमेची निविदा काढली गेली आहे. मात्र गेले 3 वर्षे शहरातील पर्यावरणवादी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे काम आजही अविरतपणे चालू आहे. त्यामुळे जलपर्णी ही ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात येते. ही येणारी जलपर्णी काही प्रमाणात कमी होऊन जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत जलपर्णीने नदी व्यापली नाही, असे असताना तिनही नद्यांची जलपर्णी काढण्यासाठी 2 कोटी ते सव्वादोन कोटी पर्यंतचे निविदा काढण्याचे काय कारण? ही करदात्यांच्या पैशाची लूट नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान अद्यापही संबधित ठेकेदाराला आदेश देऊनही ठेकेदराने काम सुरू केले नाही. मग प्रशासन जलपर्णी पावसाने वाहून जाण्याची वाट पाहत आहे का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. गेले 3 वर्षे अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीने नदीतील जलपर्णी काढण्याचे काम मनापासून करणार्‍या स्वयंसेवी संस्थेने स्वतःचा निधी वापरून अतिशय चांगले काम पवना नदीवर केले असताना प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. तरी केजुबाई बंधारा येथील जलपर्णी लवकरात लवकर काढण्याचे काम महापालिकेने करावे अशी मागणी पर्यावरणप्रेमी करत आहेत.