दमानियांना दाऊदची धमकी!

1

खडसेंविरोधातील खटले मागे घेण्याची धमकी दिल्याचा दावा

मुंबई : आम आदमी पक्षाच्या माजी नेत्या व माहिती अधिकार कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांना पाकिस्तानमधून दाऊद इब्राहीमने दूरध्वनी करून माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधातील खटले मागे घेण्यासाठी धमकी दिल्याचा दावा केला आहे. शुक्रवारी रात्री 12.33 मिनिटांनी हा दूरध्वनी आल्याचे दमानिया सांगत असून, तसे त्यांनी ट्वीटही केले आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी हे ट्वीट टॅग केले आहे. भाजपनेते खडसे यांच्याविरोधातील सर्व खटले मागे घेण्याचे या धमकीद्वारे सांगितले असल्याचेही दमानिया यांनी नमूद करत, गुन्हे शाखेच्या सहआयुक्तांनाही त्यांनी याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

पाकिस्तानातून आला दूरध्वनी
आपल्या ट्वीटमध्ये अंजली दमानिया यांनी नमूद केले, की रात्री साडेबारा वाजता 922135871719 या क्रमांकावरून त्यांना धमकीचा दूरध्वनी आला. हा क्रमांक ट्रू कॉलरवर टाकला असता दाऊद-2 असे नाव आले व तो पाकिस्तानातील लॅण्डलाईन क्रमांक असल्याचे नमूद आहे. या दूरध्वनीद्वारे कोण बोलत होते तसेच इतर तपशील त्यांनी ट्वीटरवर शेअर केला नाही. तथापि, खडसे यांच्याविरोधातील खटले मागे घेण्यासाठी धमकी देण्यात आल्याचे नमूद केले. दमानिया यांनी यापूर्वीही एकनाथ खडसे व दाऊद इब्राहीम यांचे संबंध असल्याचा आरोप केला होता. तसेच, खडसे यांना कराचीतून दाऊदचे फोन आल्याचा आरोपही केला होता. दमानिया यांना यापूर्वीही धमकीचे दूरध्वनी आल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांची सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे.

गडकरींसह पवारांवरही केले होते आरोप
अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसे यांच्यासह भाजपचे माजी अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर महाराष्ट्रातील सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप केलेले आहेत. तसेच, त्या आम आदमी पक्षाच्या नेत्या असताना राज्यातील 72 हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचा पर्दाफाशही त्यांनी केला होता. सिंचन घोटाळ्याप्रकरणीही त्यांना अनेकांच्या धमक्या आलेल्या आहेत. त्याबाबत पोलिसांत तक्रारीही दाखल झालेल्या आहेत. गडकरी व शरद पवार यांचे व्यावसायिक संबंध असल्यानेच सिंचन घोटाळ्याचे प्रकरण दाबले जात असल्याचा आरोपही त्यांनी नुकताच केला होता. सद्या दमानिया व खडसे यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरु आहे. त्यातच दाऊदचा दूरध्वनी आल्याचा आरोप करून त्यांनी खळबळ उडवून दिलेली आहे.