‘दाम करी काम’, शिक्षकानंतर आता डॉक्टरांकडून 25 पेट्या?

0 1

महापालिकेत नवीन पायंडा

पिंपरी – भय, भ्रष्टाचार मुक्त, पारदर्शक कारभाराचा नारा देत पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधीश झालेल्या भाजपचा ‘अस्वच्छ’, भ्रष्टाचारयुक्त कारभार उघडकीस येऊ लागला आहे. एका शिक्षकामागे सात लाख रुपये घेतल्याच्या आरोपांचे ‘मळभ’ संपते की नाही तोवर दुसरा आरोप होऊ लागला आहे. वायसीएमएच रुग्णालयातील मानधन तत्वावरील 53 प्राध्यापक, सहायक प्राध्यापक डॉक्टरांना महापालिका सेवेत कायम करण्यासाठी दहा पेट्यांची ‘उलाढाल’ होणार होती. विशेषम्हणजे दोन वर्ष शांत बसल्यानंतर स्वपक्षीय नगरसेवकच या कारभाराबाबत बोलत आहेत. कोणी किती पेट्या घेतल्या याची उकल करुन सांगत आहेत. गुरुजी, देवासमान माणल्या जाणा-या डॉक्टरांकडून देखील ‘दाम’ घेतले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून महापालिकेत ‘दाम करी काम’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळलेल्या जनतेला भाजपने पारदर्शक, भय, भ्रष्टाचारमुक्त कारभाराची साद दिली. भाजपच्या सादेला शहरातील जनतेने भरभरुन प्रतिसाद दिला. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचे 77 नगरसेवक निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्यातील पिंपरी महापालिकेवर डौलाने भाजपचे कमळ फुलले. महापालिकेतील भाजपच्या अभुतपुर्व सत्तेला दोन वर्ष पुर्ण होत असताना भाजपमधील ‘अस्वच्छ’ कारभार चव्हाट्यावर येऊ लागला आहे. राष्ट्रवादीच्या 15 वर्षाच्या भ्रष्ट कारभाराची जेवढी चर्चा झाली नाही, तेवढी भाजपच्या दोन वर्षाच्या कारभाराची होऊ लागली आहे. राष्ट्रवादीपेक्षा भाजप एक पाऊल पुढे असल्याचे दिसून येत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षक भरतीमध्ये एका जागेसाठी तब्बल सात लाखांचा भाव फुटल्याचा आरोप झाला. एका शिक्षकाला सात लाख याप्रमाणे यामध्ये साडेतीन कोटींची उलाढाल सत्ताधा-यांनी केल्याचा आरोप आहे. याबाबतचा प्रस्ताव शिक्षण समिती आणि महासभेत देखील गोंधळातच मंजूर करुन घेतला. यावर अगोदर आवाज उठविणारे विरोधक त्यानंतर शांत झाले. त्यामुळे त्यांच्या भुमिकेविषयी संशय कायम आहे. सत्ताधा-यांच्या चुकीच्या कामाला आयुक्तांनी लगाम घालत हा प्रस्ताव फेटाळला. महापालिका सेवा नियमात अंतर्गत जिल्हा बदलीची तरतूदच नाही. जिल्हा बदलीचा शासन निर्णय देखील उपलब्ध नाही. त्यामुळे हा प्रस्ताव आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी फेटाळला. तसेच अनधिकृत फलक काढण्याच्या वाढीव अडीच कोटीचा सदस्यपारित ठराव देखील आयुक्तांनी फेटाळला.

वायसीएमएच रुग्णालयातील मानधन तत्वावरील 53 प्राध्यापक, सहायक प्राध्यापक डॉक्टरांना महापालिका सेवेत कायम करण्याची उपसूचना घुसडण्याचा प्रस्ताव महासभेत झाला. त्यासाठी एक डॉक्टरने 15 पेट्या देण्याची तयारी दर्शविल्याची सांगितले गेले. यामध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणार असल्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात सुरु आहे. त्याची उकल भाजप नगरसेवकांनीच केली. त्यामुळे महासभेत आक्रमक होत, भाजप नगरसेवकांनीच हा विषय हाणून पाडला. यामुळे ‘अस्वच्छ’ कारभार चव्हाट्यावर येऊ लागला आहे. विशेषम्हणजे दोन वर्ष शांत बसल्यानंतर स्वपक्षिय नगरसेवकच या कारभाराबाबत बोलत आहेत.

दोन वर्ष उलटले तरी सत्ताधा-यांना सभागृह चालविण्यात अपयश येत आहे. कोणत्याही विषयाला कोणतीही उपसूचना दिली जाते. विसंगत उपसूचना असतात. विरोधक देखील निष्क्रिय आहेत. निष्क्रिय विरोधकांमुळे सत्ताधा-यांचे फावत आहे. कारभा-यांनी या चुकीच्या कामावर वेळीच नियंत्रण आणने अपेक्षित आहे.