दिल्ली पोलिसांना फटकावणारे हायकोर्टाच्या न्यायाधीशांची बदली!

0

नवी दिल्ली: दिल्लीत झालेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांना फटका लगावणारे दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश एस. मुरलीधर यांची पंजाब, हरयाणा हायकोर्टात बदली करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या कॉलिजीयमने १२ फेब्रुवारीला झालेल्या आपल्या बैठकीत त्यांच्या बदलीची शिफारस करण्याचा निर्णय घेतला होता. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या सल्ल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश एस. मुरलीधर यांची पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात बदली केली आहे.

न्यायाधीश एस. मुरलीधर यांची २९ मे २००६ ला दिल्ली हायकोर्टाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली होती. इथल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांनी आयपीसी कलम ३७७ ला देखील नॉन क्रिमिनल घोषित केले होते. ज्येष्ठतेनुसार न्यायाधीश मुरलीधर हे दिल्ली हायकोर्टातील न्यायाधीशांमध्ये तिसऱ्या स्थानी होते. आता बदलीनंतर पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात ते मुख्य न्यायाधीश रविशंकर झा यांच्यानंतर दुसऱ्या स्थानी असतील.

दरम्यान न्यायमूर्ती मुरलीधर यांच्या बदलीचा निषेध करणारे ट्विट प्रियंका गांधी यांनी केले आहे. त्यात त्या त्यांनी सध्याच्या वातावरणात न्यायमूर्ती मुरलीधर यांच्या ऐन मध्यरात्री करण्यात आलेली बदली तशी धक्कादायक नाही. पण ती खेदजनक आणि लाजीरवाणी बाब आहे. देशातील कोट्यवधी लोकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. मात्र सरकार असे प्रकार करून न्यायाचे तोंड बंद करू पाहत आहे.