दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला शुभारंभ; कडक सुरक्षा व्यवस्थेत मोदींची सभा !

0

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ फोडण्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी याची सभा होणार आहे. शुक्रवारी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात निदर्शने झालेल्या दरियागंज येथून रामलीला मैदान अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर असल्याने मोदींच्या सभेसाठी कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. याच सभेत मोदी दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फोडण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. या सभेत मोदी हे देशभरात तापलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत बोलणार का याकडेही सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.

दिल्लीतील 1734 अवैध वसाहती वैध करण्यासाठीच्या मुद्द्यावर भाजपाकडून सकाळी ११ वाजता रामलीला मैदानात ‘धन्यवाद’ सभेचे आयोजन करण्यात आले आहे. जवळपास दोन लाखांपर्यंतची गर्दी या सभेला जमण्याचा दावा भाजपाकडून केला जात आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अनुचित प्रकार टाळण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांची नजर राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दिल्लीत शुक्रवारी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात झालेल्या निदर्शनानंतर हिंसाचार झाल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच जामियामध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मोदींची ही सभा सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.