दिल्ली विधानसभेसाठी आरपीआयने मागितल्या ४ जागा

0

नवी दिल्ली: नुकतीच दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. ही निवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. भाजपासह कॉंग्रेस पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. द्र्माय्न भाजपाचा सहयोगी पक्ष असणारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने भाजपाकडे चार जागांची मागणी केली आहे. पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी भाजपाकडे चार जागा मागितल्या आहेत. भाजपासोबत युती न झाल्यास सहा जागांवर आरपीआय स्वबळावर लढेल, असा निर्धार आठवलेंनी केला आहे. त्यामुळे आता भाजपा नेमकं काय करणार याकडे लक्ष लागलं आहे.

भाजपाने चार जागा न दिल्यास आरपीआय सहा जागांवर स्वबळावर लढेल आणि इतर जागांवर भाजपाला समर्थन देईल, असं आठवलेंनी म्हटलं आहे. आरपीआय दिल्ली विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचं आठवलेंनी आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी आमची भाजपासोबत चर्चा सुरू आहे. ही बातचीत निष्फळ ठरल्यास पक्ष सहा जागांवर उमेदवार देईल आणि इतर जागांवर भाजपाच्या पाठिशी उभा राहील, अशी भूमिका त्यांनी मांडली. निवडणूक लढण्यासाठी आमच्याकडे योग्य उमेदवार असल्याचे देखील ते म्हणाले.

यंदा दिल्लीत भाजपाचं सरकार येईल असा विश्वास रामदास आठवलेंनी व्यक्त केला. दिल्लीतलं वातावरण भाजपाच्या बाजूनं असून मतदार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली कामं लक्षात घेऊन मतदान करतील, असं आठवलेंनी म्हटलं. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ८ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. ११ फेब्रुवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. गेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला ७० पैकी ६७ जागा मिळाल्या. तर भाजपाला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावं लागलं होतं. या निवडणुकीत काँग्रेसला खातंही उघडता आलं नव्हतं.