Sunday , March 18 2018

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात मांत्रिक बोलावला, रुग्णावर जादूटोणा!

महिलेला बरे करण्यासाठी डॉक्टरांच्या समक्ष मांत्रिकाने उतारा काढला
रुग्णालय प्रशासनाचे हात वर; म्हणे तो डॉक्टर आमचा नाही!

पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झालेली महिला लवकर बरी व्हावी यासाठी डॉक्टरांनीच मांत्रिकाला पाचारण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र रुग्णालय प्रशासनाने असे काही घडले नसल्याचा खुलासा केला. सदर महिला मृत्यू पावली असून, तिच्यावर चुकीची शस्त्रक्रिया झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिवसभर उमटत होत्या. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने या घटनेचा निषेध नोंदवला असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने याप्रकरणी हात वर केले असून, संबंधित डॉक्टर आमचा नाही. असा प्रकार आम्ही होऊ देत नाही, अशी माहिती दिली आहे.

महिलेचा सोमवारी पहाटे मृत्यू
छातीत गाठ झाल्याने संध्या सोनवणे (वय 24, राहणार दत्तवाडी, पुणे) या महिलेला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिलेचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला आहे. त्यानंतर रूग्णालयात जादूटोणा झाल्याचा प्रकार उघड झाला. या महिलेला आधी स्वारगेट येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तब्येत खालावल्याने तिला मंगेशकर रूग्णालयात आयसीयूत दाखल दाखल करण्यात आले. मात्र, त्यांच्यावर जादूटोणा करण्यासाठी मांत्रिकाला पाचारण करण्यात आल्याचा आरोप तिच्या भावानेच केला आहे. डॉक्टर सतीश चव्हाण यांनी या मांत्रिकाला आणल्याचे व नजर उतरवण्यासाठी उतारा काढल्याचा आरोप भावाने केला. मात्र, बहिणीची तब्येत महत्त्वाची असल्याने आपण त्याबाबत काही बोललो नाही असेही त्याने पत्रकारांना सांगितले. यासंदर्भातला व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यामध्ये एक व्यक्ती हातात फुल घेऊन महिलेच्या अंगावरून उतारा काढत असल्याचे दिसते. तसेच या व्हिडिओमध्ये नजर उतरवल्याचा संदर्भ अस्पष्ट ऐकायला येत आहे.

चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया झाली
संध्या सोनवणे यांच्यावर चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया झाली. त्यात रक्तस्राव झाला आणि त्यांना जीव गमवावा लागला, असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. शिवसेनेचे शहर संघटक सचिन तावरे यांनी तक्रार गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. डॉक्टर सतीश चव्हाण यांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी आपल्याला फोन केला असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने असा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा केला आहे. हे पुण्यातील नामांकित रुग्णालय आहे. त्यामुळे असा प्रकार घडणे शक्य नाही. विनाकारण कोणीतरी ही अफवा पसरवत आहे, असे रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आले. तर पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मांत्रिकाला रुग्णाच्या नातेवाईकांनी बोलाविले की दीनानाथ रुग्णालयाने याची चौकशी व्हायला हवी असे सांगत संपूर्ण माहिती आल्यावरच बोलू असे म्हटले आहे.

गुन्हा दाखल करण्याची अंनिसची मागणी
अंधश्रद्धा निर्मुलन समितीने या घटनेनंतर संताप व्यक्त करताना गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. डॉक्टरी पेशाला अत्यंत लांच्छनास्पद असा हा प्रकार आहे. पुण्यात होणारे प्रकारे धक्कादायक आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या तपासाच्या वेळी प्लँचेट करण्यात आले होते आणि आता खुद्द डॉक्टरांनी मांत्रिक आणला होता, हे गंभीर आहे. आम्ही या संदर्भात तक्रार दाखल करणारच आहोत. पण जादूटोणा विरोधात पोलिसही तक्रार दाखल करू शकतो, त्यामुळे त्यांनी आम्ही तक्रार दाखल करण्याची वाट पोलिसांनी बघू नये, अशी प्रतिक्रिया पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांनी दिली आहे.

हे देखील वाचा

आकर्षक शोभायात्रांनी गुढीपाडवा सजला

ढोलताशांचा दणदणाट, लेझीमचं शिस्तबद्ध संचलन, पारंपारिक पोशाखात नटलेल्या मंडळींचा सहभाग घराघरांवर उभारल्या गुढ्या : वाहनांपासून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *