लाभार्थींच्या घरी जावून प्रांतांसह तहसीलदारांनी केली धान्याची पडताळणी

0

तामसवाडीतील स्वस्त धान्य दुकानांची प्रशासनाकडून ‘रीयॅलिटी चेक’

रावेर : गोरगरीबांच्या धान्याचा एक दाणाही इकडे-तिकडे केला तर याद राखा, अशी कडक शब्दात तंबी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी तालुक्यातील तामसवाडी येथील स्वस्त धान्य दुकानदाराला दिली आहे. या दुकानाची शुक्रवारी त्यांनी अचानक तपासणी केली असता काही लाभार्थींना धान्य वितरीत झालेले नसल्याचे आढळून आले. यावेळी तहसीलदार उषाराणी देवगुणे उपस्थित होत्या.

लाभार्थींना सुखद धक्का : प्रशासनाकडून पडताळणी
प्रांताधिकारी डॉ. जित थोरबोले व तहसीलदार उषारणी देवगुणे यांनी शुक्रवारी तालुक्यातील तामसवाडी येथील नागरीकांच्या थेट घरी जाऊन वाटप करण्यात आलेल्या धान्याची पडताळणी केली. या पडताळणीत साहेबराव रायमळे यांनी चार किलो धान्य कमी दिल्याची माहिती प्रांताधिकारी यांना दिल्याने तत्काळ संबधित लाभार्थीला बोलावून त्यांना सर्वांसमोर कमी दिलेले धान्य देण्यात आले. यावेळी ग्रामसेवक उपस्थित राहत नसल्याची तक्रार नागरीकांनी थेट प्रांताधिकार्‍यांकडे केल्याने या ग्रामसेवकावर कारवाई करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना सरपंचाना देण्यात आल्या. यावेळी प्रांताधिकारी डॉ. थोरबोले व तहसीलदार देवगुणे यांनी गावातील नितीन प्रकाश गाढे, राजू रमेश रायमळे, शरद यशवंत रायपुरे, सुमन शंकर रायमळे व इंदुबाई इंगळे या लाभार्थींच्या घरी जाऊन मिळालेल्या धान्याची पडताळणी केली. यावेळी मंडळाधिकारी सचिन पाटील, तलाठी दादाराव कांबळे, सरपंच सुनील तडवी, पोलीस पाटील, सुलक्षणा रायमळे, बोरखेडा पोलीस पाटील, अरुण पाटील उपस्थित होते.

तहसीलदारांनी केली दुकानांची तपासणी
तालुक्यातील रेशन दुकानाबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने तहसीलदार उषारणी देवगुणे यांनी वाघोदा खुर्द, मस्कावद बुद्रुक, मस्कावद सीम, जिन्सी, गुलाबवाडी, कुसुंबा बुद्रुक, चिंचाटी, तामसवाडी येथील प्रत्येकी एक तर पाल, लोहारा, कुसुंबा बुद्रुक व सावदा येथील प्रत्येकी दोन दुकानांची अशा एकूण 16 दुकानांची या आठवड्यात तपासणी केली आहे. या दुकानाच्या तपासणी दरम्यान अनियमितता व जादा भावाने विक्रीसह धान्य कमी देण्याचे प्रकार आढळल्याने वाघोदा खुर्द येथील एका तर सावदा येथील दोन दुकानदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.