दीपनगरात वीज निर्मिती ठप्प : सर्व संच शट डाऊन

0

वीज निर्मिती महाग : कोळसा वाहतुकीचा खर्चही वाढला

भुसावळ : साऊथ इस्ट कोल फिल्डमधून येणार्‍या कोळसा वाहतुकीचा खर्च वाढल्याने परीणामी वीज निर्मितीचे दर वाढले होते तर सोमवारी लोड डिस्पॅच सेंटरच्या आदेशानुसार दीपनगरातील प्रत्येकी 500 मेगावॅट क्षमतेचे संच क्रमांक चार व पाच हे दोन्ही संच शटडाऊन करण्यात आल्याने दीपनगरात आता वीज निर्मिती ठप्प झाली आहे. यापूर्वीच वर्षभरापासून 210 मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक तीन बंद असल्याने दीपनगरातून होणारी 1210 मेगावॅट विजेची निर्मिती पूर्णपणे ठप्प झाली आहे.

दीपनगरात वीज निर्मिती ठप्प्
दीपनगर औष्णिक केंद्रातील प्रत्येकी 500 मेगावॅट क्षमतेचे संच क्रमांक चार व पाचमधून उच्चांकी वीज निर्मिती सुरू होती मात्र यातून होणारी वीज निर्मिती महानिर्मितीसह अन्य खाजगी वीज उद्योगांतून होणार्‍या वीज निर्मितीपेक्षा महागडी ठरत आहे. संच क्रमांक चार आणि पाचमधून निर्माण होणारी वीज प्रतीयुनिट तीन रुपये 34 पैसे इतकी आहे. राज्यातील इतर औष्णिक केंद्राचे प्रतीयुनिट दर दोन रुपये 80 पैसे ते 3 रुपये 30 पैशांच्या दरम्यान आहेत. या तुलनेत भुसावळातील वीज महाग असल्याने एमओडी तत्वानुसार संच क्रमांक चार आणि पाच बंद करण्यात आल्याचे बोलले जात आहे. दीपनगर केंद्रातील 210 मेगावॅट स्थापित क्षमतेचा संच क्रमांक तीन वर्षभरापासून बंदच आहे. आता पुन्हा नवीन 500 मेगावॅटचे दोन्ही संचही बंदच्या निर्णयामुळे दीपनगरातून निर्माण होणारी वीजनिर्मिती पूर्णपणे ठप्प झाली आहे. भुसावळ औष्णिक केंद्राला यापूर्वी विदर्भातील वेस्टर्न कोलफिल्डमधून कोळसा मिळत असल्याने वाहतूक खर्च कमी होती मात्र आता साऊथ इस्ट कोल फिल्डमधून कोळसा येत असल्याने वाहतूक खर्च वाढला आहे. याच कारणामुळे प्रतीयुनिट वीज निर्मिती दरही वाढल्याने 500 मेगावॅट क्षमतेचे दोन्ही विस्तारीत संच एमओडीमध्ये गेले.