दुचाकी चोरी प्रकरणी कुविख्यात सादीक अली इराणी जाळ्यात

0

भुसावळ- भुसावळ बाजारपेठ पोलिसात दाखल दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात पोलिस दप्तरी कुविख्यात असलेल्या सादीकअली ईबादत अली जाफरी उर्फ इराणी उर्फ सादिक जाफरी इराणी उर्फ सादिक परवेज शेख (आतंक, वय 29 रा.पापा नगर, भुसावळ) यास बाजारपेठ पोलिसांनी पुण्यातील कोथरूड पोलिसांकडून ट्रान्सपर वॉरंटच्या आधारे ताब्यात घेतले आहे. 29 जानेवारी 2019 रोजी बाजारपेठ पोलिसात पल्सर चोरीचा गुन्हा आरोपीविरुद्ध दाखल होता. तेव्हापासून आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. आरोपीला चैन चोरीच्या गुन्ह्यातील पुण्यातील कोथरूड पोलिसांनी अटक केल्याची माहिती बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांना मिळाल्यानंतर त्यांनी हवालदार सुनील जोशी, सुभान तडवी, विकास सातदिवे यांना आरोपीला ताब्यात घेण्याचे आदेश दिल्यानंतर कारवाई करण्यात आली.

बुलढाणा पोलिस घेणार आरोपीचा ताबा
कुविख्यात सादीक अलीला बाजारपेठ पोलिसांनी अटक केल्यानंतर गुरुवारी त्यास न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून चोरीला गेलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपीने बुलडाणा, खामगाव, शेगाव येथे चैन व मंगळसूत्र चोरीचे गुन्हे केले असून तसे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाल्याने बुलढाणा पोलिस आरोपीचा ताबा घेणार आहेत.