दुसर्‍या दिवशीही कचराकोंडी

0

प्रभारी आयुक्तांनी आरोग्य विभागाची बैठक


जळगाव: गेल्या दोन महिन्यापासून मनपाने वेतन अदा केले नसल्याच्या कारणावरुन मक्तेदाराने सोमवारपासून कामबंद केले आहे. परिणामी शहरात कचरा कोंडी झाली आहे. शहरात घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरम्यान, प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी आरोग्य विभागाची बैठक घेवून आरोग्य अधिकार्‍यांना धारेवर धरले. तसेच मनपाचे कायम सफाई कर्मचार्‍यांच्या माध्यमातून सफाई करण्याबाबत सूचना दिल्या.सफाई कर्मचारी गैरहजर राहिल्यास बडतर्फची कारवाई केली जाईल असा इशारा देखील प्रभारी आयुक्तांनी दिला. उपमहापौर अश्विन सोनवणे यांनी देखील आढावा घेतला.

शहरात गेल्या दोन दिवसांपासून सफाई मक्तेदाराच्या कामगारांनी कामबंद केले आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र कचरा साचलेला आहे. कचराकुंड्या ओव्हर फ्लो झाल्या आहेत. त्यामुळे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी बैठक घेतली. यावेळी महापौर भारती सोनवणे, स्थायी सभापती अ‍ॅड. शुचिता हाडा, भगत बालाणी, कैलास सोनवणे , नितिन बरडे, आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रभारी आयुक्तांनी साफसफाईसाठी देण्यात आलेल्या एकमुस्त मक्त्याची माहिती घेतली. यादरम्यान,प्रशासनाच्या चुकांमुळे आरोग्य अधिकार्‍यांना धारेवर धरले. पर्यायी व्यवस्थेबाबत प्रभारी आयुक्तांनी महापौर आणि सभापती यांच्याशी चर्चा केली.

अन्यथा बडतर्फीची कारवाई

गेल्या दोन दिवसांपासून साफसफाई होत नसल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न उद्भवला आहे. त्यामुळे मनपा आरोग्य विभागातील कायम सफाई कर्मचार्‍यांकडून सफाई करावी,कचरा उचलावा अशा सूचना दिल्या. गैरहजर राहिल्यास बडतर्फीची कारवाई केली जाईल असा इशारा प्रभारी
आयुक्तांनी दिला.