दूचाकीवरून पडून ५१ वर्षीय इसमाचा मृत्यू

शिरपूर। शहरातील माळी गल्लीमध्ये दूचाकीवर मागे बसलेल्या इसमाचा तोल जाऊन जमिनीवर पडून एका ५१ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना सायंकाळच्या सुमारास घडली. सुनील वासुदेव चव्हाण (वय ५१, रा.माळी गल्ली, शिरपूर) असे मयत झालेल्या इसमाचे नाव आहे. ते शिरपूर वरवाडे नगर पालिकेचे कर्मचारी होते.
सविस्तर असे, शिरपूर वरवाडे नगर पालिकेचे कर्मचारी सुनील वासुदेव चव्हाण हे ६ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास गल्लीतील राजेंद्र गोरख चव्हाण यांच्या दूचाकीच्या मागील सीटवर मागे बसले होते. त्यावेळी त्यांचा अचानक तोल जाऊन ते खाली जमिनीवर पडले. तेव्हा त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेथे डॉ.योगेश अहिरे यांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी उपजिल्हा रुग्णालयातील वार्डबॉय अशोक बिरारी यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहे.