दोन दहशतवादी भारतात घुसले; भारत – नेपाळ सीमेवर हाय अलर्ट !

0

बस्ती: आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटच्या (आयएस) दोन दहशतवाद्यांनी उत्तर प्रदेशात प्रवेश केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. त्यापार्श्वभूमीवर भारत – नेपाळच्या सीमेवरील सिद्धार्थनगर जिल्ह्यात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल समद व इलियास हे दोन मोस्ट वांन्टेड दहशतवादी उत्तर प्रदेशात घुसले असून ते नेपाळच्या सीमेवरून पळून जाऊ शकतात. त्यामुळे भारत – नेपाळ सीमेवरील सिद्धार्थनगर जिल्ह्यात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

महाराजगंज, कुशीनगर आणि सिद्धार्थनगरसह नेपाळच्या सीमेवरील जिल्ह्यांत पोलिसांनी सतर्क होऊन बंदोबस्त वाढवला आहे. गुप्तचर यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, हे दहशतवादी भारत – नेपाळ सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यातून नेपाळमध्ये पळून जाऊ शकतात. त्यांच्या शोधार्थ संपूर्ण गोरखपूर झोनमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हे दोन दहशतवाद्यांना पश्चिम बंगालच्या सिलीगुडी येथे शेवटचे दिसले होते. हे दोघेही आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आयएसशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. हे दोघेही उत्तर प्रदेशात दाखल झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे आणि हे दोघेही भारत – नेपाळ सीमेला लगत असलेल्या जिल्ह्यामार्गे नेपाळमध्ये पलायन केले असावेत अशी शक्यता वर्तवली जात आहे.