दोन दिवसांच्या अल्टीमेटमनंतरही रक्कम न भरल्याने दोन गाळे सील

0

महापालिकेची फुले मार्केटमध्ये कारवाई ; न्यायालयाने दिले होते आदेश

जळगाव : महापालिकेच्या गाळे सील करण्याच्या कारवाई विरोधात फुले मार्केट मधील 5 व्यापार्‍यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. यात कामकाजादरम्यान न्यायालयाने व्यापार्‍यांना दोन दिवसांचा अल्टीमेटम देवून 75 टक्के रक्कम भरण्याचे आदेश दिले होते. यानंतरही दोन दिवसांत 75 टक्के पूर्ण रक्कम न भरणार्‍या व्यापार्‍याचे फुले मार्केटमधील दोन गाळे शनिवारी महापालिकेने सील केले आहेत. मार्केटमधील दुकाने सुरु होण्यापूर्वी पहाटेच्या सुमारास महापालिकेने केलेल्या कारवाईने व्यापार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

5 व्यापार्‍यांनी घेतली होती न्यायालयात धाव
महानगरपालिकेच्या मालकीच्या शहरातील 20 व्यापारी संकुलातील दुकानांचे भाडे करार संपुष्टात आले आहे. या व्यापारी संकुलामधील दुकानांचा भाडे करार संपुष्ठात आला असतांना गेल्या 7 वर्षापासून संबधित व्यापार्‍यांकडून मनपाच्या दुकानांचा अनधिकृत पणे वापर केला जात आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने व्यापार्‍यांना मनपा अधिनियम 81 ब नुसार नोटीसा बजावून थकबाकी भरण्याचे सुचित केले मात्र, मनपाच्या नोटीसांना व्यापार्‍याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने तसेच काही व्यापार्‍यांकडून थकबाकीतून एक रुपयाही भरला जात नसल्यामुळे गाळे कारवाईला सुरुवात करण्यात आली होती. त्यामुळे फुले मार्केट मधील आनंद रोशनलाल नाथाणी, महेंद्र नाथाणी यांच्यासह इतर अशा एकूण 5 व्यापार्‍यांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. व्यापार्‍यांनी दाखल याचिकेवर न्या. सानप यांच्या न्यायालयात कामकाज झाले असता न्या. सानप यांनी व्यापार्‍यांना दोन दिवसाचा अल्टीमेटम देवून 26 ऑक्टोंबरपर्यंत 75 टक्के रक्कम भरण्याचे आदेश दिले होते.

मार्केट सुरु होण्यापूर्वी पहाटेच केली कारवाई
न्यायालयाचे आदेशानुसार आनंद रोशनलाल नाथाणी यांनी 35 लाख 65 हजार 26 रुपये या 75 टक्के रकमेपैकी संपूर्ण रक्कम न देता, 27 लाख रुपये जमा केले. 8 लाख 65 हजार 26 रुपये दिल नाही. त्यामुळे आदेशानुसार पैसे भरले नाही म्हणून नाथाणी यांचे दुकान नं.5 आणि दुकान नं.48 वर मनपा अधिनियम 81 ब नुसार कारवाई करण्यात येवून गाळे सील करुन ताब्यात घेण्यात आले. गाळे सील करण्याबाबत पंचनामा करण्यात येवून या कारवाईबाबत महापालिकेतर्फे शहर पोलिसात पत्रही देण्यात आले आहे.