धक्कादायक…मृत्यूनंतरही रुग्णांवर डॉक्टरांकडून पाऊण तास उपचार

0

नातेवाईकांचा आरोप अन् डॉक्टरांसोबत वाद 

जिल्हापेठ पोलिसांची मध्यस्थी

जळगाव : शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या पोटात कापसाचा बोळा राहणे, कात्री राहणे या डॉक्टरांच्या हलगर्जीपणाच्या घटना असो की रुग्णालयात पारिचारिकांनी केलेले नृत्य असो अशा विविध कारणांनी जिल्हा रुग्णालय आणि शासकीय महाविद्यालय नेहमी चर्चेत असते. मात्र येथील रुग्णसेवेने चक्क कळस गाठला. शनिवारी डॉक्टरांनी मृत रुग्णांवर पाऊण तास उपचार केल्याची घटना धक्कादायक घटना समोर आली आहे. नातेवाईकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करत गोंधळ घातल्याने जिल्हापेठ पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.

शहरातील आसोदा रोड परिसरातील रहिवासी रवींद्र भिका पाटील (वय 44, मूळ रा. विदगाव) यांची शनिवारी दुपारी प्रकृती अचानक बिघडली. त्यांना कुटुंबियांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. ते तीन वाजेपर्यंत बोलत होते. यानंतर त्यांना वार्ड क्रमांक 9 मध्ये हलविण्यात आले. यानंतर त्यांची प्रकृती ढासळली. व त्यांना दुसर्‍या वार्डात दाखल करु नका असे सांगितल्यावर डॉक्टरांनी एैकले नाही. वॉर्ड नऊमध्ये नेत असताना त्यांना त्रास व्हायाला लागला. वॉर्ड नऊमध्ये दाखल केल्यानंतर या वॉर्डात एकही डॉक्टर नव्हते. मुलगा स्वप्नील याने धावत पळत येऊन अतिदक्षता विभागातील डॉक्टर व नर्स यांना माहिती दिली. मात्र ते मोबाईलवर बोलत होते अशी माहिती रुग्णांचे नातेवाईक किरण सुभाष काळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

आपातकालीन कक्षात हलविले अन् मृत्यू
नातेवाईकांनी संताप केल्याने पुन्हा रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांनी मयत रविंद्र पाटील यांना आपात्कालीन कक्षात हलविले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला यानंतरही पाऊण तास डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करत असल्याचे भासवले. शेवटी इसीजी लावला असता त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले असा आरोप पाटील यांचा मुलगा स्वप्नील याने केला आहे.

पोलिस बंदोबस्त वाढविला
पाटील यांच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला. व मृत्यूस रुग्णालय प्रशासन असल्याचे सांगत वाद घातल्याने तणाव निर्माण झाला होता. जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप आराक, शनिपेठचे उपनिरीक्षक बी.बी.पाटील, दिनेशसिंग पाटील आदींनी पथकासह रुग्णालय येऊन गर्दी पांगवली. पोलिसांनी संतप्त नातेवाईकांची समजुत काढल्यानंतर पाटील यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. यांनतर कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कोट…
रवींद्र पाटील यांना बेशुद्ध अवस्थेत दाखल केले. त्यांच्यावर तत्काळ उपचार करुन त्यांना शुद्धीवर आणले. दुपारपर्यंत नातेवाईकांशी बोलत होते. प्रकृती सुधारणा होत असल्याचे पाहून तसेच इमरजन्सी वॉर्ड असल्याने त्यांना वॉर्ड नऊमध्ये हलविले.
डॉ. स्वप्नील कळसकर, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय.