धानोरा येथील शेतकरी तरूणाची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या

0

जळगाव: शेतात पाणी भरून येतो असे सांगून घराबाहेर पडलेल्या बंटी उर्फ दिपक बापू पाटील (वय-22) रा. धानोरा, मोहाडी या तरुणाने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्या की घातपात हे कळू शकलेले नाही.

लग्नासाठी मुलगी पाहण्यासाठी होता जाणार

याबाबत माहिती अशी की, बंटी उर्फ दिपक बापू पाटील हा शेतीकाम करतो. रविवारी रात्री 8 ते 8.30 वाजेच्या सुमारास जेवण करून शेतात भरणा करण्यासाठी जातो असे सांगून घराबाहेर पडला. रात्री भरणा करून घरी न आल्याने घरातील आई-वडील आणि भावांना चिंता वाटली. वडील बापू गंगाधर पाटील आणि लहान भाऊ हर्षल बापू पाटील यांनी रात्री धानोरा शिवारातील शेतात जावून पाहणी केली मात्र मिळाला नाही. त्यानंतर वडील आणि लहान भाऊ यांनी शेतापासून जवळ असलेल्या रेल्वे रूळावर पाहणी केली असता रात्री 10.30 वाजता रेल्वे रूळावर मृतदेह आढळून आला.याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अत्यंत साधा व मनमिळावू स्वभाव असल्यामुळे गावात चांगला परिचित होता. दरम्यान,मुलगी पाहण्यासाठी कुटुंबासोबत बाहेरगावी जाणार होता. मयताच्या पश्चात आई सुरेखा, वडील बापू पाटील, लहान भाऊ हर्षल आणि विवाहित बहिण असा परीवार आहे.

कुसुंबा येथील तरूणाचा अति मद्यसेवनामुळे मृत्यू

कुसुंबा गावातील शिवशाही हॉटेलच्या शेजारी असलेल्या चहाच्या टपरीजवळ तरुणाचा मृतदेह आढळून आला. शरद नाना पाटील (वय-33) रा. गणपती नगर कुसुंबा असे मयत तरुणाचे नाव आहे. अति मद्यसेवनामुळे मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, शरद नाना पाटील हे एमआयडीसीतील पाईप कंपनीत ऑपरेटर म्हणून काम करतो. त्याला सहा महिन्यांपासून दारूचे व्यसन जडले होत. रविवारी सकाळी 9 वाजता कामावर जातो असे सांगून घराबाहेर पडला. रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने पत्नी मनिषा आणि नातेवाईकांनी शोधाशोध केल्यावरही मिळून आले नाही. आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास गावातील शिवशाही हॉटेलच्या शेजारी असलेल्या चहाच्या टपरीजवळ मयत स्थितीत आढळून आले. नातेवाईकांनी तातडीने जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई- वडील असा परीवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.