धुम्रपान करणार्‍या मनपाच्या 12 कर्मचार्‍यांना दंड

0

महापौर,स्थायी सभापती,उपायुक्तांनी केली कारवाई

जळगाव- शासकीय कार्यालयात धुम्रपान करण्यास मनाई आहे. मात्र मनपात अनेक कर्मचारी धुम्रपान करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही जण कार्यालयात पान , गुटखा खाऊन भिंतींवर थुंकत असल्याने भिंती रंगल्या आहेत. त्यामुळे महापौर भारती सोनवणे,स्थायी सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा,उपायुक्त अजित मुठे यांनी सकाळी मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभे राहून कर्मचार्‍यांची झाडाझडती घेतली. दरम्यान,12 कर्मचार्‍यांकडे गुटखा आढळून आल्याने प्रत्येकी 100 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

मनपा इमारतीमध्ये भिंती पान-गुटख्या खाऊन थुंकल्याने रंगल्या आहेत.त्यामुळे कर्मचार्‍यांची झाडाझडती घेवून अचानक कारवाई करण्यात आल्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली. यावेळी महापौर भारती सोनवणे, स्थायी समिती सभापती अ‍ॅड. शुचिता हाडा, उपायुक्त अजित मुठे,नगरसेवक कैलास सोनवणे, आरोग्यधिकारी विकास पाटील उपस्थित होते. यावेळी ज्या कर्मचार्‍यांकडे गुटखा , तंबाखूच्या पुड्या आढळल्या त्यांच्याकडून कचरापेटीत टाकण्यात आल्या. तसेच 12 जणांना दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

प्लास्टीक पिशव्या विक्रेत्याला 5 हजारांचा दंड
नवीपेठेत आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांनी केलेल्या पाहणीत सतनाम स्टोअर्स या विक्रेत्याकडे 24 किलो प्लास्टीकच्या पिशव्या आढळून आल्या. याप्रकरणी सहायक उपायुक्त पवन पाटील यांनी या विक्रेत्यावर 5 हजार रुपये दंडाची कारवाई केली. यावेळी मनपाचे कर्मचारी रमेश गुजांळ, कैलास जगताप व इतर कर्मचारी उपस्थित होते.