धुळ्यातील डेअरीत गोळीबारानंतर लूट : आरोपी जाळ्यात

0 1

लुटीच्या पैशाततून केला साथीदारावर गोळीबार : दोन पिस्तुलांसह काडतुसेही जप्त

धुळे – शहरातील मालेगाव रोडवरील न्यू प्रतीक डेअरीत गोळीबार करून रोकड लुटून पसार झालेल्या दोघांना पोलिसांनी रात्रीतून अटक केली असून लुटीतील पैसे वाटप करताना त्यांच्यात वाद झाल्याने त्यांनी आपल्याच साथीदारावर पुन्हा गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या वादानंतरच संशयित आरोपी पोलिसांच्या हाती लागले. त्यातील सागर व विनोद मरसाळे यांना ताब्यात घेतले आहे. तर गुरू भालेराव नामक संशयितावर उपचार सुरू आहेत. आरोपींनी दोन दिवसांपूर्वी सायंकाळी मालेगाव रोडवरील डेअरीत लूट केल्यानंतर दोन दुचाकींनी पळ काढला होता. एका हॉटेलवर जेवणासाठी आरोपी थांबल्यानंतर त्यांच्या लुटीच्या पैशांवरून वाद झाला. या वेळी विनोद मरसाळे याच्या हातात पिस्तूल होते व ते हाताळताना गोळी सुटून गुरू भालेराव याच्या पायाला लागली. त्यामुळे तो जखमी झाला. मनमाडमधील एका खाजगी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. त्यामुळे संशयित मनमाडमध्ये लपले असल्याची माहिती मिळाली. यानंतर एका पथकाने जाऊन सागर मरसाळे व विनोद मरसाळे यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यातील लूटमधील नऊ हजार 850 रुपये तसेच सुमारे 60 हजार रुपये किमतीचे दोन पिस्तूल, पळ काढण्यासाठी वापरलेल्या वाहनासह प्रत्येकी 25 हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली. जखमी असलेल्या भालेराव याच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती अधीक्षक एम. रामकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, उपअधीक्षक सचिन हिरे, पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे उपस्थित होते. मोहाडी ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकाला मरसाळेबद्दल माहिती मिळाली होती.