धुळ्यातील महिलेच्या खुनप्रकरणी पाळधीच्या संशयीताला अटक

0 2

मयत पिंप्राळ्याची रहिवासी ; ब्लॅकमेल करीत असल्याने केला खून

धुळे- धुळ्यातील आग्रा रोडवरील राजस्थान लॉजमध्ये एका महिलेचा गळा कापून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली होती. खुनानंतर संशयीत पसार झाला होता मात्र पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपीला अटक केली आहे. मयत जळगावच्या पिंप्राळ्यातील रहिवासी असल्याची माहिती निष्पन्न झाली असून आरोपीशी असलेल्या अनैतिक संबंधातून ती ब्लॅकमेल करीत असल्याने तिचा संशयीताने काटा काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, योगिता मोहन शिरसाठ (32, पिंप्राळा, जळगाव) असे मयत महिलेचे तर नितीन विश्‍वनाथ पाटील (34, पाळधी खुर्द, ता.धरणगाव, जि.जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

संशय आल्याने महिलेचा खून झाला उघड
आग्रा रोडवरील राजस्थान लॉजमध्ये एका जोडप्याने पती-पत्नी असल्याचे सांगत सोमवारी रूम बुक केली होती. संबंधित इसमाने सुरेश निळे (रा.वरखेडे) असे सुरुवातीला आपले नाव सांगितले होते तर तो औषधी घेण्यासाठी बाहेर जातो, असे सांगून बाहेर पडला मात्र बराच वेळ झाल्यानंतरही निळे नामक इसम हॉटेलमध्ये न परतल्याने हॉटेल्स स्टॉपला संशय आल्यानंतर त्यांनी खोली तपासली असता या इसमासोबत आलेली महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळल्यानंतर खळबळ उडाली. पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे, प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक प्रमोद कुदळे, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणेश चौधरी यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.

तगादा लावल्याने काढला काटा
समजलेल्या माहितीनुसार, मयत योगीता शिरसाठ याचे आरोपी नितीन पाटीलसोबत अनैतिक संबंध होते व घर, शेती नावावर करण्यासाठी संबंधित महिला तगादा लावत होती शिवाय आरोपीच्या घरीदेखील अनैतिक संबंधाची कुणकुण लागल्याने या प्रकाराला कंटाळून आरोपी नितीनने तिचा खून केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मयत विवाहितेच्या पतीचे निधन झाले असून तिला दोन मुले असल्याचे सांगण्यात आले.

मोबाईलवरून लागला आरोपीचा छडा
खून केल्यानंतर आरोपी पसार झाला होता मात्र मयत महिलेजवळ आढळलेल्या मोबाईलमधील क्रमांकावरून आरोपीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.विश्‍वास पांढरे, अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गणेश चौधरी, सहाय्यक निरीक्षक डी.ए.पाटील, सहा.निरीक्षक हिरालाल बैरागी, मुक्तार मन्सुरी, कबीर शेख, प्रल्हाद वाघ, योगेश चव्हाण, राहुल पाटील, पंकज खैरमोडे, कमलेश सूर्यवंशी, गफ्फार शेख आदींच्या पथकाने केली.