धुळ्यातील वैद्यकीय महाविद्यालयात ‘कोरोना’ तपासणी सुरू

0

धुळे : धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत (व्हायरल रिसर्च ॲण्ड डायग्नोस्टिक लॅबोरेटरी) ‘कोरोना’ विषाणूच्या तपासणीस सुरवात झाली असून आज दहा नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. अशा प्रकारे ‘कोरोना’ विषाणूची तपासणी करणारी ही उत्तर महाराष्ट्रातील पहिली प्रयोगशाळा ठरली आहे.

या प्रयोगशाळेत प्राथमिक सोयीसुविधा, यंत्रसामग्रीची उपलब्धता व कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 1.8 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या प्रयोगशाळेसाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातील 200 स्क्वेअर मीटर जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
कोरोना तपासणीसाठी ‘आयआरटीपीसीआर’ ही अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध झाली आहे. या प्रयोगशाळेच्या चाचणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेने (NIV) काही नमुने तपासणीसाठी या प्रयोगशाळेत पाठविले होते. या प्रयोगशाळेत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नागसेन रामराजे, विभागप्रमुख प्रा. डॉ. मृदुला द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत संशोधक शास्त्रज्ञ डॉ. गायत्री पोतदार, डॉ. सुप्रिया माळवी, मनीषा तमायचेकर, तंत्रज्ञ पूजा ब्राम्हणे, स्मिता ठाकूर, अनिल यादव, योगेश सोनवणे, अर्जुन वाघ यांनी नमुन्यांची तपासणी करून अहवाल पाठविले.

वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेने पाठविलेल्या अहवालांची तपासणी केल्यावर राष्ट्रीय विषाणू संस्थेने या प्रयोगशाळेस ‘कोरोना’ विषाणूच्या नमुन्यांची चाचणी करून अहवाल देण्यास 31 मार्च 2020 पासून परवानगी दिली आहे. पहिल्या दिवशी चार, तर आज दुसऱ्या दिवशी दहा नमुन्यांची तपासणी करण्यात आली. एका वेळेस 92 नमुन्यांची तपासणी करता येते. या चाचणीसाठी सध्या आठ ते दहा तासांचा कालावधी लागत आहे. सरावाने तो सहा तासांवर येईल.

यापूर्वी ‘कोरोना’ विषाणूच्या तपासणीसाठी नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत पाठवावे लागत असत. मात्र, धुळ्यातच ही सुविधा उपलब्ध झाली आहे.

‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून सुमारे चार कोटी रुपयांचा निधी औषधे व अत्यावश्यक यंत्रसामग्रीच्या खरेदीसाठी उपलब्ध करुन दिला आहे. तसेच आणखी मदत लागली, तर राज्य शासन मदत उपलब्ध करून देईल.: अब्दुल सत्तार, पालकमंत्री, धुळे जिल्हा