नंदुरबारमध्ये डॉक्टर, वकिलात थेट लढत

0

भाजपाकडून डॉ. हिना गावित, तर काँग्रेसकडून अ‍ॅड. के. सी. पाडवी यांना उमेदवारी

नंदुरबार (रवींद्र चव्हाण) – देशात पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे नमस्कार-चमत्कार सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. या मतदारसंघात भाजपाच्या विद्यमान खासदार डॉ. हिना गावित व काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार अ‍ॅड. के. सी. पाडवी यांच्यात सरळ लढत रंगण्याची शक्यता आहे.

देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या नंदुरबार मतदारसंघात यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत आपला पारंपरिक गड राखण्यास काँग्रेस यशस्वी ठरते की, भाजपाचे पुन्हा कमळ फुलते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. गुजरात, मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर असलेल्या महाराष्ट्रातील शेवटच्या टोकावरील नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रचंड चुरशीची आणि प्रतिष्ठेची होण्याची चिन्हे आहेत. हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे प्रचाराची सुरुवात याच मतदारसंघातून करण्याची परंपरा काँग्रेसने ठेवली आहे, परंतु गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यात भाजप यशस्वी ठरला होता. मोदी लाटेवर निवडून येत खासदार डॉ. हिना गावित यांच्या रूपाने प्रथमच भाजपाचे कमळ या मतदारसंघात फुलले होते. काँग्रेसचे आमदार अमरिशभाई पटेल यांच्या शिरपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांना मोठे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे काँग्रेसचे टॉप टेन खासदार माणिकराव गावित यांचा पराभव झाला होता.

एका टॉप टेन खासदाराचा पराभव केला म्हणून खासदार हिना गावित यांनी राजकारण्यांचे लक्ष वेधले होते. दांडगा जनसंपर्क, संसदेतील उपस्थिती, माजी मंत्री तथा भाजपाचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांची कन्या म्हणून असलेली ओळख या गोष्टी आता त्यांच्यासाठी जमेच्या बाजू ठरू शकतील. प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. के. सी. पाडवी हे धडगाव, अक्कलकुवा मतदारसंघातून पाच वेळा निवडून आले आहेत. त्यामुळे एक ज्येष्ठ आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ते धडगावसारख्या दुर्गम मतदारसंघातील आमदार असले तरी त्यांची जिल्हाभरात ओळख आहे. त्यांचाही जनसंपर्क दांडगा आहे. दुर्गम भागात काम करणारी व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते तरीही वकील आणि डॉक्टर यांच्या लढतीत कोण बाजी मारेल हे येणारा काळच सांगणार आहे. यंदाची निवडणूक प्रचंड चुरशीची ठरणार असल्याने नंदुरबार जिल्ह्यातील दोन्ही पक्षाच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. भाजपाच्या उमेदवार डॉ. हिना गावित या केंद्र शासनाने मतदारसंघात केलेल्या विकासाचा आरसा जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करतील हे सत्य असले तरी खासदार गावित यांना असलेला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध काय परिणाम घडवून आणतो हे पाहणे देखील औत्सुकतेचे ठरणार आहे.

दोन्ही उमेदवारांसमोर आव्हाने

निवडणुकीच्या काळात भाजपाच्या उमेदवार तथा मावळत्या खासदार हिना गावित यांच्या पुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. धनगर आरक्षणाचा मुद्दा घेऊन आदिवासी संघटना नाराज होऊन बसल्या आहेत तर दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाने देखील खासदार हिना गावित यांच्या विरोधात प्रचार करण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे या अडथळ्यांची नौका खासदार हिना गावित कशा पार करतात यावरच त्यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. के. सी. पाडवी यांनी देखील इतक्या वर्षात काय केले? असा प्रश्‍न विरोधक उपस्थित करीत आहेत. मर्यादित आमदार म्हणून त्यांनी राजकारण सुरू ठेवल्याने त्यांच्यावर विरोधक टीकेची तोफ डागत आहेत.