नंदुरबारात चर्मकार समाजाच्या वतीने निषेध मोर्चा

0

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमांना फाशीची मागणी

नंदुरबार- अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या तीनही नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी या सह अन्य मागण्यांसाठी नंदुरबार येथे मंगळवार, 31 जुलै रोजी चर्मकार समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात लहान मुलांपासून तर वयोवृद्ध समाज बांधव सहभागी झाले होते. नवापूर येथील एका चर्मकार समाजाच्या 13 वर्षाच्या शाळकरी मुलीवर तीन नराधमांनी अत्याचार केले. या घटनेनंतर ती मुलगी मृत पावली. पालकांमध्ये थरकाप उडवून देणार्‍या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात आहे. नंदुरबार शहरातही काल 31 जुलै रोजी भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला.

विविध मागण्यांचे प्रशासनाला निवेदन
शहरातील रोहिदासवाडा बाहेरपुरा भागातून सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात झाली, या मोर्चात तरुण, तरुणी, नागरीक, महिला, लहान मुलांपासून तर वयोवृद्ध लोक देखील सहभागी झाले होते. नंदुरबार जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने चर्मकार बांधव सहभागी झाले होते. शहरातील नेहरू पुतळा, नगरपालिकामार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला.तेथे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या तिन्ही नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी सरकारी वकील म्हणून उज्जवल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, पीडित मुलीच्या कुटुंबाला शासनाने 25 लाख रुपये मदत द्यावी,मुलीच्या कुटुंबांना कायदेशीर संरक्षण देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांचे निवेदन प्रशासनला देण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रीय चर्मकार संघटनेचे अध्यक्ष भानुदास विसावे यांनी केले.