नगरसेवकांनी अतिक्रमण कारवाईत हस्तक्षेप केल्यास होणार अपात्र

0

गणेश कॉलनी,बळीराम पेठ ‘नो हॉकर्स’ झोन


जळगाव : शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे.त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम सुरु आहे.परंतु कारवाई करतांना पदाधिकारी किंवा नगरसेवक हस्तक्षेप करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कारवाई दरम्यान पदाधिकारी किंवा नगरसेवकांनी हस्तक्षेप केल्यास अपात्रतेच्या कारवाईचा प्रस्ताव ठेवण्याचा निर्णय मनपा सत्ताधारी व विरोधकांनी आयुक्तांची भेट घेवून घेतला आहे. यावेळी आमदार राजूमामा भोळे हे देखील उपस्थित होते.

टाईमझोनची होणार अंमबजावणी

शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने वाहतुकीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तसेच शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महात्मा फुले मार्केटमध्ये अतिक्रमणामुळे पायी चालणेही अवघड झाले आहे. त्यामुळे उपायुक्त अजित मुठे यांच्या नेतृत्वात गेल्या आठवडाभरापासून कारवाईची मोहीम सुरु आहे. मात्र कारवाई करतांना पदाधिकारी किंवा नगरसेवक हस्तक्षेप करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आमदार राजूमामा भोळे, स्थायी समिती सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा,कैलास सोनवणे,गटनेते भगत बालाणी,मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन,नितीन लढ्ढा यांनी आयुक्त उदय टेकाळे यांची भेट घेवून चर्चा केली. कारवाई दरम्यान पदाधिकारी किंवा नगरसेवकांनी हस्तक्षेप केल्यास अपात्रतेच्या कारवाईचा प्रस्ताव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.तसेच गणेश कॉलनी ते कोर्ट चौक आणि नेहरु चौक ते शनिपेठपर्यंत नो हॉकर्स झोनचा निर्णय घेवून त्या ठिकाणी टाईम झोन निश्‍चित करण्याबाबत चर्चा झाली.यावेळी उपायुक्त अजित मुठे यांना नो हॉकर्स झोन आणि टाईम झोनचे नियोजन करुन अमंलबजावणी करण्याची आयुक्तांनी सूचना दिली.

व्यापारी संकुलातील गाळ्यांचे नुतनीकरणाबाबत चर्चा

मनपा मालकीच्या 18 व्यापारी संकुलातील 2387 गाळ्यांची मुदत 2012 मध्ये संपुष्टात आली आहे. गेल्या सात वर्षापासून गाळ्यांचा प्रश्‍न प्रलंबित आहे. मनपा प्रशासनाने कलम 81 क ची नोटीस बजावली असून काही गाळेधारकांनी थकीत रकमेचा भरणा केलेला आहे. मुदत संपलेल्या गाळ्यांचे लिलाव की नुतनीकरण याबाबत तिढा कायम आहे. दरम्यान,आमदार राजूमामा भोळे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी आयुक्तांची भेट घेवून गाळे नुतनीकरणाबाबतचा प्रस्ताव पाठविण्याची सुचना दिली आहे.