नमस्कार न केल्याने भुसावळात एकावर चाकूने जीवघेणा हल्ला

0

भुसावळ शहरातील नाहाटा चौफुलीवर घटना ; दोघा आरोपींना बाजारपेठ पोलिसांनी केली अटक ; जखमीवर गोदावरी रुग्णालयात उपचार

भुसावळ- शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले असून पोलिस प्रशासन गुन्हेगारी थोपवण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. सहा दिवसांपूर्वी प्रेम संबंधाच्या वादातून तरुणावर दोघा मित्रांनीच चाकू हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा नाहाटा चौफुलीनजीक केवळ नमस्कार न केल्याने एका तरुणावर चाकूने हल्ला केल्याची 28 रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोन युवकांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, सहा दिवसांपूर्वी डी.एस.ग्राऊंडवर झालेल्या हल्ल्यातील जखमीची सहाव्या दिवशी प्राणज्योत मालवल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

भुसावळात पुन्हा चाकू हल्ला
शहरातील नाहाटा चौफुलीजवळील दीनदयाल नगर रीक्षा स्टॉपजवळ संशयीत आरोपी अमोल राणे, आकाश राजपूत व विशाल घेंगट हे उभे असताना तक्रारदार खुशाल संजय दराडे (22, श्रीराम नगर, वांजोळा रोड, भुसावळ) हा मित्रासह आल्यानंतर आरोपींनी तुम्ही दादा झाले का, आम्हाला नमस्कार का केला नाही? म्हणत वाद घातला. यावेळी तक्रारदाराने मी कशाला दादा होवू, मला कुणाशीही काही देणेघेणे नाही, असे म्हटल्यानंतर आरोपी अमोल राणे याने त्याच्याजवळील चाकूने वराडे याच्या मानेजवळील कंठावर तीन वार केल्याने तो खाली कोसळला. चाकू हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले. बाजारपेठचे चालक तथा सहाय्यक फौजदार तस्लीम पठाण, निलेश बाविस्कर, दीपक जाधव, प्रशांत चव्हाण, बंटी कापडणे, चेतन ढाकणे यांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमीला आधी खाजगी रुग्णालयात हलवले मात्र प्रकृती अधिक खालावल्याने त्यास गोदावरी रुग्णालयात हलवण्यात आले. डीवायएसपी गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक देविदास पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी रात्री विशाल घेंगट तसेच अमोल राणे या संशयीतांना अटक केली तर आकाश राजपूत हा पसार झाला आहे. संशयीतांविरूध्द यापूर्वीच पोलिसांकडे गुन्हे दाखल आहेत. आरोपींच्या ताब्यातून चाकूदेखील जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दराडे याच्या फिर्यादीनुसार तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश शिंदे करीत आहेत.