नागरिकांच्या सुरक्षिततेचाच खून?

0

किशोर पाटील

जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीत वाढ झाल्याचे चित्र आहे. चोरी, दरोडा या घटनांबरोबरच खूनाच्या गुन्ह्यांमध्येही वाढ झाली आहे. गेल्या पाच महिन्यात विचार केल्यास जिल्ह्यात दहा ते 15 जणांचा खून झाल्याची आकडेवारी आहे. केवळ खूनाच्या नाही तर बलात्कार आणि विनयभंगाच्याही घटनेत वाढ झाल्याने सामान्य नागरिकांबरोबरच जिल्ह्यातील महिलाही असुरक्षित असल्याचे सध्यस्थितीतील चित्र आहे. या घटनांना कोण कसे जबाबदार आहे, याचा विचार केला तर प्रथमदर्शनी पोलिसांचा धाक संपला असल्यानेच गुन्हेगारी वाढली असल्याचे वास्तव आहे. मुद्याचे रूपांतर गुद्दयावर होवू लागले आहे. गुद्यावरील हाणामारीचे रुपांतर चाकू, कोयता, बंदुकीपर्यंत जावून त्यातून थेट जीव घेण्यापर्यंत माणसांची मजल गेली आहे. पोलिसांचे नियंत्रण कुठेतरी कमी पडतय की काय असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. खरं तर गुन्हेगारी प्रवृत्तीसाठी झालेली मानसिकता, आणि पोलिसांचे अपयश यामुळे सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे असे म्हटले तर नवल वाटायला नको..!

आताच्या काळात मुद्यावरुन गुद्यापर्यंत हाणामारी थेट खून करण्यापर्यंत जावून पोहचली आहे. सहनशक्ती, संयम नसलेल्या आताच्या पिढीची मानसिकता जरी याला कारणीभूत असली तरी दुसरी बाजू म्हणजे पोलिसांचा धाक संपला आहे. पूर्वीप्रमाणे आता खाकीचा दरारा राहिलेला नाही .ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. त्यामुळे गुन्हेगारांची हिंमत वाढली आहे. पोलीस, तसेच कायद्याची भिती नसल्याने कोवळ्या मुलींवर अत्याचार, विनयभंग करुन त्यांना कुचकरण्याची नराधामांचीही हिंमतही वाढली असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. शिकण्या, खेळण्याच्या वयातील तरुण पिढीचा गुन्हेगारीतील वाढता सहभाग ही सुध्दा शोकांतिका आहे. रात्री उशीरापर्यंत उभ्या राहणार्‍या हातगाड्या गुन्हेगारी वाढण्यास कारणीभूत असून पोलिसांची हप्तेखोरी नागरिकांच्या जीवावर उठली आहे.

पूर्वीच्या काळी पोलिसांचे नुसते नाव काढले की , अंगावर काटा (भिती) उभा रहायचा. छातीत धडक भरायची. खाकीचा दरारा असायचा. कारण प्रामाणिक पोलिसिंगही असायची. मारहाणी, चोरीच्या घटना वर्षात, महिन्यात एकदा कानी पडायच्या. कारण चोरट्यांसह गुन्हेगारांना पोलिसांची तेवढी भिती होतीच. मात्र काळ जस जसा बदलला त्याप्रमाणात गुन्हेगारीचे स्वरुप बदलले. पोलिसही यात हायटेक झालेच. मात्र पूर्वीच्या काळी होणारी प्रामाणिक पोलिसिंग आता राहिली नाही. कर्तव्य सोडून झटपट श्रीमंत होण्याच्या आमिषाने पोलीस होणार्‍यांची संख्या वाढू लागली आहे. याला काही अपवादही असतील. आधी शपथ घेतल्याप्रमाणे देशसेवा, नागरिकांची सुरिक्षतता, यासाठी पोलिसिंग व्हायची. आता अवैधधंद्याला आशिर्वाद देवून त्यातून होणार्‍या हप्तेखोरीसाठी पुढे येणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांची, अधिकार्‍यांची मोठी साखळीच दिसून येत आहे. हप्तेखोरीत व्यस्त असलेल्या या कर्मचार्‍यांना, अधिकार्‍यांना देशसेवा, नागरिकांची सुरक्षितता आठवणार कशी? हा संशोधनाचा विषय आहे. कदाचित याच हप्तखोर पोलिसांमुळे खाकीचा दरारा, पोलिसांचा धाक संपला हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतीष्याची गरज नाही.

कुणाचीही भीती, भय नसलेले शाळकरी, विद्यार्थी तरुणांची थेट चॉपर, चाकू, तलवार, धारदार शस्त्र, बंदूकीचा बिनधास्त वापर करण्यापर्यंत हिंमत वाढली कशी? याला जबाबदार कोण? चोरी, दरोडा, खून झाल्यानंतर पोलीस आरोपीला काही तासातच गजाआड करतात. मात्र दरोडा, खून, बलात्कार, विनयभंग करण्यापर्यंत त्यांची हिंमतच होवू नये यासाठी काय उपाययोजना, अथवा निर्णय घेता येतील, याचा विचार होणे गरजेचे आहे. येणार्‍या काळात पोलिसांचा धाक राहिला नाहीतर ही पिढी पोलीस दलासाठी चिंतेची बाब ठरणार यात शंका नाहीच. कायदे आहेत, शिक्षा मिळेल, मात्र खाकीचा दराराही असलाच पाहिजे, व असावाच. तरच तोपर्यंत खून, अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्यार्‍या गुन्हेगारी मानसिकतेवर नियंत्रण मिळविणे शक्य आहे. त्यासाठी प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांची गरज आहे, हेही तितकेच खरे आहे.